
गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयातील कथित हलगर्जीपणामुळे लांझेडा येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निबोंरकर यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्यचिकित्सकांना जाब विचारत प्रशासकीय यंत्रणेला चांगलेच धारेवर धरले.
लांझेडा येथील रहिवासी मंदाताई विजय एैडलावार यांचा १८ जानेवारी २०२६ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालय (कॉम्प्लेक्स) येथे त्यांना दाखल करण्यात आले होते, मात्र वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि अखेर त्यांचा प्राण गेला, असा आरोप नातेवाईक आणि नागरिकांकडून केला जात आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर गडचिरोली दौऱ्यावर असताना आयोजित आढावा बैठकीत नगराध्यक्षांनी हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. जिल्हा शल्यचिकित्सकांकडे बघून त्यांनी विचारले की, “जर रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले असते, तर एक जीव वाचू शकला नसता का?” या प्रश्नामुळे बैठकीत काही काळ शांतता पसरली होती.
जिल्हा रुग्णालय हे गरिबांसाठी आधार केंद्र आहे, मृत्यूचा सापळा नाही. उपचारातील विलंब आणि डॉक्टरांची निष्क्रियता यामुळे एखाद्याचा जीव जात असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही. असे नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निबोंरकर यांनी सांगितले. दोषींवर कारवाई: या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी. अहवाल सार्वजनिक करा: चौकशीचा अहवाल दडपून न ठेवता तो जनतेसमोर जाहीर करावा. सुधारणांची गरज: भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी रुग्णालयातील उपचार व्यवस्था अधिक सक्षम आणि पारदर्शक करावी. अशी मागणी निंबोरकर यांनी केली.
सामान्य नागरिकांनी या भूमिकेचे स्वागत केले असून, आरोग्य विभागात चाललेल्या मनमानी कारभारावर आता आरोग्यमंत्री काय ॲक्शन घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील संशयास्पद बाबींमुळे आरोग्य प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



