गडचिरोलीविदर्भ

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाचा भाजपकडून तीव्र निषेध

माजी खा. डॉ. अशोक नेते यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन ; इंदिरा गांधी चौकात जोरदार घोषणाबाजी

गडचिरोली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानाशी केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने गडचिरोलीत तीव्र निदर्शने करण्यात आली. माजी खासदार डॉ. अशोक नेते आणि भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक इंदिरा गांधी चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी आंदोलकांनी काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना अन्य कोणाशीही करणे हा केवळ महाराजांचा अपमान नसून तो संपूर्ण शिवप्रेमी जनतेच्या भावनांशी खेळ आहे,” असा संतप्त सूर यावेळी उमटला. इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती-धर्मांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. महाराजांचे कार्य अतुलनीय आहे. अशा महान राजाची तुलना टिपू सुलतानाशी करून काँग्रेसने आपली वैचारिक पातळी दाखवून दिली आहे. मतांच्या राजकारणासाठी इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न भाजपा कधीही सहन करणार नाही.” त्यांनी संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करून भविष्यात अशी विधाने टाळण्याचा इशारा दिला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे नगराध्यक्षा ॲड. प्रणिता निंबोरकर, उपनगराध्यक्ष निखिल चरडे, समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, शहराध्यक्ष व सभापती अनिल कुनघाडकर, मुक्तेश्वर काटवे, हर्षल गेडाम, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, वर्षा शेडमाके, साक्षी बोलुवार, युवा व जिल्हा नेते सागर निंबोरकर, अरुण हरडे, घनश्याम वाढई, दिनेश नवघडे, दतु माकोडे, निखिल सुंदरकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “काँग्रेसचा धिक्कार असो” अशा घोषणांनी इंदिरा गांधी चौक परिसर दुमदुमून गेला होता. महाराजांच्या सन्मानासाठी आणि इतिहासाच्या रक्षणासाठी भाजपा सदैव रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button