
गोंदिया: ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि शाश्वत शेतीसाठी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील केलसर येथील ‘समृद्ध CLF गट’ एक दिशादर्शक ठरत आहे. ‘सूक्ष्म प्रकल्प सन २०२४-२५’ अंतर्गत ४५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या या सेंद्रिय भाजीपाला व रोपवाटिका प्रकल्पाने अल्पावधीतच यश संपादन केले असून, या उपक्रमामुळे ५०० कुटुंबांना उपजीविकेचा भक्कम आधार मिळाला आहे.
स्थानिक महिला स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून हा प्रकल्प चालविला जात आहे. क्षेत्र: ४.५ एकर रोपवाटिका आणि तब्बल ४५ एकर क्षेत्रावर सेंद्रिय भाजीपाला उत्पादन. उत्पादन क्षमता: दररोज २ टन भाजीपाल्याचे उत्पादन. सहभाग: एकूण १८० सदस्यांचे सक्रिय योगदान. ही या उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्याला बाजारपेठेत मोठी मागणी मिळत आहे. या उपक्रमामुळे केवळ स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण झाला नाही, तर महिला स्वयंसहाय्यता गटांतील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मोठी मदत झाली आहे. ५०० कुटुंबांना थेट रोजगार मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी चालना मिळाली आहे.
केवळ उत्पन्न वाढवणे हाच उद्देश नसून, सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आरोग्यदायी अन्ननिर्मिती आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यावरही या प्रकल्पात भर दिला जात आहे. ‘समृद्ध CLF गट’चा हा प्रयोग इतर गावांसाठीही एक आदर्श ठरत आहे. भविष्यात अशा उपक्रमांचा विस्तार करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या शाश्वत शेतीशी जोडण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
केसरमधील या प्रकल्पाने ग्रामीण भागात ‘स्थानिक उत्पादनाला’ हक्काची बाजारपेठ मिळवून दिली असून, या यशामुळे शेतकरी आणि महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.



