गडचिरोलीविदर्भ

‘मार्कंडा देवस्थान’ यात्रेदरम्यान व्यसनमुक्तीची मोहीम; ४२ हजारांचा तंबाखूजन्य साठा जप्त

गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थानची महाशिवरात्री यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही दारू आणि तंबाखूमुक्त साजरी होत आहे. देवस्थान समिती, मुक्तीपथ आणि गाव संघटनेच्या वतीने यात्रेत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्यात येत असून, नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.

यात्रेला येणाऱ्या भाविकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी एक व्यापक फळी उभारण्यात आली आहे. यात मार्कंडा देवस्थान समिती, ग्रामपंचायत समिती, स्थानिक गाव संघटन, मुक्तीपथ कार्यकर्ते, कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक यांचा समावेश आहे. या सर्वांनी मिळून घोषणा फलक, बॅनर, पोस्टर्स आणि जनजागृतीपर गाण्यांच्या माध्यमातून माहिती देत भाविकांना व्यसनमुक्तीचे आवाहन केले. केवळ आवाहनच नाही, तर प्रत्यक्ष तंबाखूविरोधी मोहीम राबवण्यात आली. यात्रेदरम्यान दुकानांची पथकाद्वारे कसून तपासणी करण्यात येत आहे. यादरम्यान बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कोटपा कायदा, ग्राम पंचायत समिती नियम अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. यावेळी ४२,००० रुपये किमतीचा बेकायदेशिर असलेला तंबाखूजन्य पदार्थाचा माल पकडण्यात आला. नियमबाह्य विक्री करणाऱ्यांकडून ३,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सातत्यपूर्ण जनजागृतीमुळे यंदा यात्रेत दारू आणि तंबाखूचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून येत आहे. “ही यात्रा पूर्णपणे व्यसनमुक्त व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि यात्रेच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही मोहीम सुरूच राहील,” असा विश्वास ग्रामपंचायत समिती, देवस्थान समिती व मुक्तीपथ टीमने व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button