भाजपाचा ‘पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियाना’तून कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचा निर्धार

मुंबईतील प्रदेश बैठकीत गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग! ; “सशक्त संघटन – सक्षम कार्यकर्ता – सबळ राष्ट्रनिर्मिती”चा नारा
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी काळात राबवल्या जाणाऱ्या “पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६” च्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेशाची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक मुंबईत उत्साहात पार पडली. या बैठकीत संघटनेची वैचारिक धार अधिक तीव्र करणे आणि बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांचे सक्षम जाळे विणण्यावर भर देण्यात आला. विशेष म्हणजे, या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत जिल्ह्यासाठीचा ठोस कृती आराखडा सादर केला.
या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय सह-संघटन महामंत्री शिवप्रकाश मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. “एकात्म मानववाद” ही विचारसरणी केंद्रस्थानी ठेवून कार्यकर्त्यांना केवळ राजकीय कार्यकर्ता न ठेवता, त्यांना समाजाभिमुख नेतृत्व म्हणून घडविणे, हा या महाअभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बरसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे एक प्रतिनिधी मंडळ या बैठकीस उपस्थित होते. यात अनिल पोहनकर (सह-संयोजक), अनिल तिडके (सह-संयोजक), सुरज गुंडमवार (सोशल मीडिया प्रमुख), सीमा कन्नमवार (महिला मोर्चा) यांचा समावेश होता. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात महाअभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, सोशल मीडियाचा वापर आणि जनसंपर्क वाढविण्याबाबत या पदाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
बैठकीत आगामी प्रशिक्षण उपक्रमांचे सविस्तर वेळापत्रक निश्चित करण्यात आले. कार्यकर्त्यांची वैचारिक बळकटी करतानाच, बुथ स्तरावरील रचना कशी असावी आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक साधनांचा (डिजिटल टूल्स) वापर कसा करावा, यावर सखोल चर्चा झाली. प्रत्येक कार्यकर्ता हा संघटनेचा कणा असून, तो प्रशिक्षित असल्यास सबळ राष्ट्रनिर्मितीचा मार्ग सुकर होतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुंबईतील या बैठकीतून मिळालेल्या सुस्पष्ट दिशेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी आता नव्या जोमाने कामाला लागणार आहेत. जिल्ह्यात प्रत्येक स्तरावर कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करून संघटनेची पकड अधिक घट्ट केली जाईल, असा निर्धार जिल्हा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. “सशक्त संघटन – सक्षम कार्यकर्ता – सबळ राष्ट्रनिर्मिती” या ध्येयवाक्यासह या महाअभियानाचा श्रीगणेशा झाला असून, गडचिरोली भाजपाच्या या सक्रिय सहभागामुळे जिल्ह्यात या मोहिमेला मोठे यश मिळण्याची चिन्हे आहेत.



