आरोग्यगोंदियाविदर्भ

कवलेवाडा पीएचसी व देवरी ग्रामीण रुग्णालयाला मानाचा ‘आरोग्य रत्न’ पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईत वितरण ; उत्कृष्ट आरोग्य सेवेसाठी गोंदियाच्या दोन संस्थांचा गौरव

गोंदिया : जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र कवलेवाडा (ता. गोरेगाव) आणि अतिदुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालय देवरी यांची राज्यस्तरीय ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ आणि ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात एका दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून यंदा आरोग्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी हा विशेष पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे अधिकृत निमंत्रण सहसंचालक डॉ. सरिता हजारे यांनी दिले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र, कवलेवाडा (उत्कृष्ट ग्रामीण सेवा) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत कवलेवाडा PHC ने वर्ष २०२५-२६ मध्ये आरोग्य निर्देशांकात बाजी मारली आहे. प्रमुख यश: सुरक्षित प्रसूती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आणि इतर आरोग्य सेवांमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक. टीमवर्क: वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा भावे यांच्या नेतृत्वात समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक-सेविका, आशा स्वयंसेविका आणि फार्मासिस्ट यांच्या एकत्रित परिश्रमाचे हे फळ आहे.

ग्रामीण रुग्णालय, देवरी (अतिदुर्गम भागातील आधार) जिल्हा शल्य चिकित्सक विभागांतर्गत देवरीच्या ग्रामीण रुग्णालयाने दुर्गम भागात राहूनही आधुनिक वैद्यकीय सेवेचा दर्जा राखला आहे. प्रमुख यश: बाह्यरुग्ण (OPD) व आंतररुग्ण (IPD) सेवा, मेजर व मायनर शस्त्रक्रिया, यशस्वी सिझेरियन आणि ‘आयुष्यमान भारत डिजिटल मिशन’मध्ये उत्कृष्ट कामगिरी. टीमवर्क: वैद्यकीय अधिकारी डॉ. गगन गुप्ता आणि त्यांच्या टीमने (नर्सेस, स्टाफ ब्रदर) दिलेली अविरत सेवा या पुरस्काराचा आधार ठरली आहे.

या राज्यस्तरीय यशामुळे गोंदियाचे नाव आरोग्य नकाशावर झळकले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी दोन्ही संस्थांच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

“उपलब्ध साधनसामुग्री आणि मनुष्यबळाचा योग्य वापर करून या दोन्ही संस्थांनी दिलेली सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे. हे यश जिल्ह्यातील इतर आरोग्य केंद्रांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button