गोंदियाविदर्भ

कुष्ठरोग जनजागृतीसाठी धावले तिरोडावासी

१६ ते २४ वयोगटातील तरुणाईचा उदंड प्रतिसाद; ५ किमी धावून दिला कुष्ठमुक्तीचा संदेश

तिरोडा : “कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र” या मोहिमेतंर्गत आणि कुष्ठरोग निवारण पंधरवाड्याचे औचित्य साधून तिरोडा शहरात कुष्ठरोग जनजागृतीसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तिरोड्यातील शेकडो युवक-युवतींनी धावून कुष्ठरोगाबाबत सामाजिक जनजागृतीचा नवा अध्याय लिहिला.

सकाळी ७ वाजता उपजिल्हा रुग्णालय, तिरोडाच्या प्रांगणातून या ५ किमी मॅरेथॉनला सुरुवात झाली. तिरोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल शेंडे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दर्शना नंदागवळी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. मार्ग: उपजिल्हा रुग्णालय ➔ अवंतीबाई चौक ➔ चिरेखणी ➔ श्री दत्त नर्सिंग स्कूल (समारोप).

या स्पर्धेत १६ ते २४ वयोगटातील मुला-मुलींनी मोठ्या जिद्दीने सहभाग नोंदवला. कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे, हा संदेश धावपटूंनी आपल्या उत्साहातून नागरिकांपर्यंत पोहोचवला. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागींना प्रोत्साहनपर बक्षिसे प्रदान करण्यात आली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले आणि सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र धनविजय यांच्या मार्गदर्शनाखाली हे यशस्वी आयोजन करण्यात आले. यामध्ये श्री. दत्तात्रेय प्रभू बहुउद्देशीय संस्था, उपजिल्हा रुग्णालय, तालुका आरोग्य विभाग आणि सहाय्यक संचालक कुष्ठरोग विभाग, गोंदिया यांचा संयुक्त सहभाग होता. श्री दत्त ग्रुपचे संस्थापक मणिलेश दिलीप भालेराव यांनी आयोजक म्हणून विशेष पुढाकार घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर भालेराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन अमोल चचाने यांनी मानले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लिलाधर निपाने, एस.एस. येरणे, प्राचार्य बी.एल. पटले, प्रज्ञा सेलारे, प्राचार्य एस.वाय. टेंभरे यांच्यासह शिक्षक वृंद आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button