गडचिरोलीविदर्भ

वैनगंगेच्या पात्रात मृत्यूशी झुंज; पोलिसांच्या तत्परतेने तिघांना मिळाले जीवनदान!

मार्कंडा यात्रेत बुडणाऱ्या युवकांसाठी देवदूत ठरले पोलीस शिपाई 

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या देव मार्कंडा मंदिर यात्रेचा उत्साह रविवारी एका भीषण संकटात बदलता बदलता वाचला. वैनगंगा नदीच्या पात्रात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडणाऱ्या तीन युवकांना गडचिरोली पोलीस दलाच्या प्रशिक्षित जलतरणपटूंनी स्वतःच्या प्राणाची बाजी लावून सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांच्या या अद्वितीय शौर्यामुळे यात्रेकरूंनी “खाकी वर्दीतील माणुसकी”चे दर्शन घडल्याची भावना व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथील रहिवासी सुमित शेंडे (१६) हा आपल्या मित्रांसह महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडा यात्रेसाठी आला होता. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास नदीपात्रात अंघोळीसाठी उतरला असता, त्याला खोल पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले त्याचे दोन मित्रही पोहण्याचे कौशल्य नसल्याने पाण्याच्या वेगवान प्रवाहात अडकले. तिघांचीही मृत्यूशी सुरू असलेली झुंज पाहून नदीकाठावरील भाविकांच्या काळजाचा ठोका चुकला.

घटनेचे गांभीर्य ओळखून बंदोबस्तावर तैनात असलेल्या जिल्हा पोलीस दलाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ हालचाली केल्या. जिल्हा पोलीस दलातील राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू पोलीस शिपाई बाबासाहेब विलास वासनिक आणि गोपाळ हणमंय्या आलाम यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंमडे यांच्यासह थेट नदीच्या पात्रात झेप घेतली. खोल पाण्याचा आणि प्रवाहाचा सामना करत या दोघांनीही बुडणाऱ्या तिन्ही युवकांना एकापाठोपाठ एक सुरक्षितपणे किनाऱ्यावर ओढून आणले.

या मोहिमेत पोलीस शिपाई बाबासाहेब वासनिक यांचे धैर्य विशेष चर्चेचा विषय ठरले. सध्या व्हीआयपी सुरक्षा पथकात कार्यरत असलेले वासनिक हे राष्ट्रीय स्तरावरील निष्णात जलतरणपटू आहेत. त्यांचा समुद्र आणि नद्यांमधील पोहण्याचा दांडगा अनुभव काल तीन कुटुंबांसाठी ‘संजीवनी’ ठरला. विशेष म्हणजे, वासनिक हे केवळ स्वतः कुशल नाहीत, तर त्यांनी शेकडो तरुणांना पोलीस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण देऊन सक्षम केले आहे.

यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नदीकाठी आपत्ती व्यवस्थापन पथके २४ तास तैनात आहेत. भाविकांनी उत्साहाच्या भरात नदीच्या खोल पात्रात उतरू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button