
मुंबईत आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव ; नक्षलग्रस्त व दुर्गम असूनही प्रभावी अंमलबजावणीत डंका
गोंदिया : जिल्ह्याने आरोग्य क्षेत्रात पुन्हा एकदा राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा’त (NTEP) उत्कृष्ट कामगिरी बजावत गोंदिया जिल्ह्याने महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, सलग दोन वर्षे हा मानाचा ‘महाआरोग्य सन्मान’ प्राप्त करणारा गोंदिया हा राज्यातील पहिलाच जिल्हा ठरला आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात २२ फेब्रुवारी रोजी आयोजित दिमाखदार सोहळ्यात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.
ल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांच्या नेतृत्वात जिल्ह्याने केंद्र व राज्य सरकारने ठरवून दिलेल्या १४ विविध निर्देशकांवर (Indicators) प्रभावी काम केले आहे. यामध्ये रुग्ण शोध मोहीम: संशयित रुग्णांची मोफत थुंकी तपासणी आणि डिजिटल एक्स-रे. निक्षय पोर्टल: सर्व रुग्णांची ऑनलाइन नोंदणी आणि प्रभावी पाठपुरावा. निक्षय पोषण योजना: रुग्णांना सकस आहारासाठी थेट बँक खात्यात आर्थिक लाभ मिळवून देणे. समुपदेशन: औषधोपचार अर्धवट सोडू नये यासाठी रुग्णांचे व सहवासितांचे समुपदेशन. या बाबींचा समावेश होता.
गोंदिया जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या आदिवासी, नक्षलग्रस्त आणि जंगलव्याप्त सीमावर्ती भाग आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही, उपलब्ध मनुष्यबळात नियोजनबद्ध कार्यक्रम राबविल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी क्षयरोग विभागाच्या चमूचे विशेष कौतुक केले आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना डॉ. गोल्हार म्हणाले की, “हे यश वैयक्तिक नसून ते गाव पातळीवरील आरोग्य सहाय्यक, आशा सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) आणि तालुका स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांच्या सांघिक कार्याचा विजय आहे. जनजागृती, सर्वेक्षण आणि उपचार या त्रिसूत्रीमुळेच आम्ही जिल्ह्याला या स्थानी नेऊ शकलो.”
जिल्ह्याच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, आणि आरोग्य विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्हा क्षयरोग विभागाचे अभिनंदन केले आहे.



