
नवीन प्रशासकीय इमारतीत नागरिकांची तुडुंब गर्दी
गोंदिया : राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने उचललेले पाऊल कौतुकास्पद ठरत आहे. गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीत आयोजित तीन दिवसीय चित्रमय मल्टीमीडिया प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, एकाच ठिकाणी ४० हून अधिक योजनांची माहिती उपलब्ध झाल्याने नागरिकांची मोठी सोय झाली आहे.
या प्रदर्शनीला चंद्रभान खंडाईत (उपविभागीय अधिकारी), मानसी पाटील (उपजिल्हाधिकारी), शृती डोंगरे (जिल्हा युवा अधिकारी, ‘मेरा युवा भारत’) या अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. या अधिकाऱ्यांनी प्रदर्शनीतील प्रत्येक दालनाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. “शासनाच्या क्लिष्ट वाटणाऱ्या योजना सर्वसामान्यांना सहज समजाव्यात, यासाठी चित्रमय आणि मल्टीमीडिया माध्यमाचा वापर करणे ही काळाची गरज आहे,” अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी या उपक्रमाचा गौरव केला.
या प्रदर्शनीमध्ये शेतकरी, महिला, नवउद्योजक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विशेष योजनांची मांडणी करण्यात आली आहे. तांत्रिक माहिती देण्याऐवजी ती चित्रमय स्वरूपात असल्याने कमी शिकलेल्या नागरिकांनाही योजनांचे स्वरूप आणि लाभ घेण्याची प्रक्रिया चटकन समजत आहे. यामुळेच प्रदर्शनीच्या ठिकाणी युवकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांची गर्दी पाहायला मिळत आहे.
सदर प्रदर्शनी २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सर्वांसाठी खुली राहणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी या प्रदर्शनीला भेट देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, याची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
“एकाच ठिकाणी सर्व विभागांच्या योजनांची सचित्र माहिती मिळाल्यामुळे आम्हाला कोणत्या कार्यालयात जायचे आणि कागदपत्रे काय लागतील, याचा अंदाज आला आहे. हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे.”
– प्रदर्शनीला भेट दिलेला एक महाविद्यालयीन विद्यार्थी



