
गडचिरोलीत १५० व्या जयंती निमित्त धोबी समाजाचा भव्य मेळावा आणि पालखी शोभायात्रा
गडचिरोली : “सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या धोबी समाजाने संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा, शिक्षणाचा आणि स्वावलंबनाचा मंत्र आत्मसात करावा. संघटित होऊन आपल्या न्याय्य हक्कासाठी लढण्याची शक्ती निर्माण केली, तरच समाजाची सर्वांगीण प्रगती होईल,” असे प्रतिपादन नगर परिषदेचे माजी सभापती विजय गोरडवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य परीट, धोबी, वरठी सेवा संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती निमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. येथील पटेल मंगल कार्यालयात हा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धोबी समाजाचे जिल्हाध्यक्ष संतोष आकणूरवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष रोहनकर, दामोधर येम्पल्लीवार, प्रभुदास कुरूडकर, दिवाकर येम्पल्लीवार, रमेश गडपायले, अरुण केळझरकर, जिल्हाध्यक्षा शिल्पा कोल्हटवार, संघटन सचिव लता वरघंटे, सचिव कल्पना चतुरकर, उपाध्यक्षा मंगला केळझरकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी वक्त्यांनी गाडगेबाबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. संघटनेचे सचिव मोरेश्वर मानपल्लीवार यांनी प्रास्ताविकातून समाजापुढील आव्हाने आणि संघटनेच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सोनाली सुरनकर यांनी केले.
सभेच्या समारोपानंतर शहरातून संत गाडगेबाबांची भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली. “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” च्या गजरात आणि ढोल-ताशांच्या नादात निघालेली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून फिरली. पारंपारिक वेशभूषेतील समाजबांधव आणि महिलांच्या सहभागामुळे या यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
या ऐतिहासिक जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रविण ताजने, अरविंद मादेश्वार, नेताजी कावळे, अमोल दासरवार, राजु कंठीवार, नितिश केळझरकर, प्रभु रोहनकर, महेश कोतकोंडावार, मानिक केळझरकर, नरेश कावळे, प्रमोद ताडपल्लीवार, किशोर केळझरकर, मयुर दासरवार, प्रकाश राजकोंडावार आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
“शिक्षण आणि संघटन हीच प्रगतीची दोन चाके आहेत. गाडगेबाबांचे विचार केवळ भिंतीवर न ठेवता ते जगण्यात आणले पाहिजेत.”
— संतोष आकणूरवार, जिल्हाध्यक्ष



