भूसुरुंगविरोधी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, एक गंभीर जखमी

चामोर्शी : तालुक्यातील चौडमपल्लीजवळ भूसुरुंगविरोधी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तरुण ठार झाला, तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना १३ डिसेंबरला दुपारी अडीच वाजता घडली.
गणेश बाजीराव मडावी (३३, रा. लगाम ता. चामोर्शी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर रवी हनमंतु मडावी (३८, रा. लगाम) हा जखमी आहे. ते दोघे आष्टीहून लगामकडे दुचाकीवरून (क्र. एमएच ३३ एक्स ३३०७) जात होते. त्याचवेळी अहेरीहून गडचिरोलीकडे पोलिसांच्या ताफ्यातील भूसुरुंगविरोधी वाहन (एमपीव्ही- ०२८५) येत होते. चौडमपल्लीजवळ भूसुरुंगविरोधरी वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली. यात गणेश बाजीराव मडावी जागीच ठार झाला, तर रवी मडावी गंभीर जखमी झाला. रवीला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रुग्णालयात हलविण्यात आले. अधिक तपास आष्टी ठाण्याचे पो.नि. विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भाऊराव वनकर आहेत.
या घटनेतील मृत गणेश मडावी हा विवाहित होता. त्याची मुलगी अवघ्या २० दिवसांची आहे. मुलगी झाल्याने घरी आनंदी वातावरण होते; परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते. चिमुकलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने कुटुंबासह नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, अपघातानंतर कुटुंबीय व नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या घटनेला जबाबदार असलेल्या चालकावर कारवाईची मागणी त्या सर्वांनी लावून धरली.



