गडचिरोलीविदर्भ

चामोर्शी-हरणघाट मार्गाचे रूप पालटणार! ; २०० कोटींच्या निधीतून रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम सुरु

खड्ड्यांच्या त्रासातून नागरिकांची होणार सुटका

गडचिरोली : जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा या खराब मार्गाची चर्चा नेहमीच होत असते, मात्र चामोर्शी ते मूल (हरणघाटपर्यंत) या मार्गाची अवस्थाही काही वेगळी नव्हती. अनेक वर्षांपासून खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे ‘कुप्रसिद्ध’ ठरलेल्या या मार्गाचे रूप आता अखेर पालटणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने २०० कोटी रुपयांच्या भरघोस निधीतून या रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

हा रस्ता वारंवार दुरुस्त करूनही पुन्हा का खराब होत होता, याचे तांत्रिक विश्लेषण सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता धिरज बड्डे यांनी मांडले. त्यांच्या मते, रस्ता खराब होण्यामागे क्षमतेपेक्षा जास्त भार: या मार्गाची झेप घेण्याची क्षमता नसतानाही त्यावरून सतत अवजड वाहतूक सुरू होती. पाण्याचा निचरा न होणे: रस्ता जमिनीच्या पातळीशी समतल असल्याने शेतातील मातीमिश्रित पाणी रस्त्यावर साचायचे, ज्यामुळे डांबरीकरण टिकत नव्हते. ही दोन मुख्य कारणे होती.

निधीअभावी आजवर केवळ मलमपट्टी (तात्पुरती डागडुजी) केली जात होती. मात्र, आता राज्य शासनाने २०० कोटी रुपये मंजूर केल्यामुळे हा संपूर्ण मार्ग मजबूत सिमेंट काँक्रीटचा बनविला जाणार आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी साचल्याने रस्ता खराब होण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे.

“पुरेशा निधीअभावी आजवर आम्हाला केवळ तात्पुरती डागडुजी करावी लागत होती. मात्र आता २०० कोटींचा निधी उपलब्ध झाल्याने आम्ही या रस्त्याची पूर्णपणे पुनर्बांधणी करत आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होईल. असे सा.बां. विभाग, सहायक अभियंता धिरज बड्डे यांनी सांगितले.

प्रशासकीय नियमांनुसार हे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, या मार्गाचे महत्त्व आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्च २०२७ पर्यंतच हे काम पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. या निर्णयामुळे चामोर्शी आणि मूल परिसरातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेक वर्षांच्या मानसिक त्रासातून आता त्यांची कायमची सुटका होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button