गडचिरोलीविदर्भ

कोनसरी येथे ‘लॉयड्स ग्रीन स्टील प्रकल्पा’चे २२ जुलै रोजी भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा ; माजी खा. डॉ. अशोक नेते यांनी केली पाहणी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले जात आहे. चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे ‘लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड’च्या एकात्मिक ग्रीन स्टील निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन आणि विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी संपन्न होणार आहे. हा भव्य कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून, जिल्ह्याच्या औद्योगिक वाटचालीतील हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी कोनसरी येथील कार्यक्रमस्थळाला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची बारकाईने पाहणी केली. त्यांनी नियोजन, सुरक्षा, वाहतूक आणि स्वागत यंत्रणा यांचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले.

या पाहणी दौऱ्यात डॉ. अशोक नेते यांच्यासोबत भाजप जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेशजी, तसेच गोलूभाऊ सोमनानी हे उपस्थित होते.

या कोनसरी प्रकल्पामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, या प्रकल्पामुळे परिसराचा सामाजिक आणि आर्थिक विकास अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या वतीने आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. २२ जुलै हा दिवस गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button