गडचिरोलीविदर्भ

बँकेचा अट्टाहास जिवावर बेतला! ; ‘त्या’ वृद्ध महिलेचा मृत्यू

उपचारासाठी स्वतःचेच पैसे मिळवताना नातेवाईकांची परवड; पोर्ला शाखेच्या व्यवस्थापकाविरुद्ध जिल्ह्यात संतापाची लाट

गडचिरोली : बँक प्रशासनाच्या अमानवीय अट्टाहासामुळे आणि नियमांच्या नावाखाली चालवलेल्या छळामुळे एका वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यात समोर आली आहे. औषधोपचारासाठी स्वतःचे हक्काचे पैसे काढण्याकरिता कोमात असतानाही बँकेच्या दारात रुग्णवाहिकेतून आणल्या गेलेल्या शांताबाई हरिदास मानकर (७०) यांचे २८ फेब्रुवारी रोजी निधन झाले. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रातील ‘मानवता’ हरवल्याचे विदारक चित्र समोर आले असून, दोषी अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

काटली येथील रहिवासी शांताबाई मानकर या गेल्या काही दिवसांपासून कोमात होत्या. त्यांच्या उपचारासाठी पैशांची नितांत गरज असल्याने त्यांची मुलगी आणि जावई २५ फेब्रुवारी रोजी बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा पोर्ला येथे गेले होते. त्यांनी वारंवार विनवणी केली की, “आई कोमात आहे, कृपया त्यांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन पैसे द्यावेत.” मात्र, माणुसकी विसरलेल्या शाखा व्यवस्थापकाने “खातेदाराला प्रत्यक्ष हजर करा, त्याशिवाय पैसे मिळणार नाही”, अशी ताठर आणि आडमुठी भूमिका घेतली.

खरे तर आरबीआयच्या नियमानुसार, जर खातेदार गंभीर आजारी असेल, तर मेडिकल सर्टिफिकेट घेऊन किंवा बँकेच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष घरी जाऊन खात्री करून व्यवहार पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र, पोर्ला शाखेच्या व्यवस्थापकाने हतबल नातेवाईकांना वारंवार परत लावले. अखेर नाइलाजास्तव नातेवाईकांनी खाजगी वाहन भाड्याने करून कोमात असलेल्या शांताबाईंना बँकेच्या दारात आणले. या शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि अखेर काल (२८ फेब्रुवारी) त्यांची प्राणज्योत मालवली.

“एका ७० वर्षांच्या वृद्धेला स्वतःच्या पैशांसाठी मृत्यूशी झुंज देत असताना बँकेच्या पायऱ्या चढाव्या लागतात, ही लोकशाहीसाठी लाजीरवाणी बाब आहे,” अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावरही बँक ऑफ महाराष्ट्रच्या या ‘अमानवीय’ कारभारावर टीकेचा भडिमार होत आहे.

या दुर्दैवी मृत्यूनंतर आता जिल्हाधिकारी आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोर्ला शाखेच्या व्यवस्थापकावर कठोर कारवाई करावी, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना तात्काळ निलंबित करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button