
गोंदिया : एस.एस. गर्ल्स कॉलेज व जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने “मराठी भाषा गौरव दिन” तसेच प्रख्यात साहित्यिक विष्णु वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. शारदा महाजन होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे-निमसरकर, तसेच प्रा. सहादेव तित्तरमारे उपस्थित होते. यावेळी प्रा.डॉ. गोकुला ढोके, प्रा.डॉ. ईश्वरी खटवाणी, प्रा. संजय कळंबे व उपसंपादक कैलाश गजभिये यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. मराठी प्रेरणा गीताने वातावरण भारावून गेले. उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. शारदा महाजन यांनी मराठी भाषेचे सांस्कृतिक व बौद्धिक महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींनी भाषेचा अभिमान बाळगावा, असे आवाहन केले. प्रा. सहादेव तित्तरमारे यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्यिक कार्याचा आढावा घेत विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अंजु कांबळे-निमसरकर यांनी मराठी भाषा संवर्धनासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी काव्यपठण व कथाकथन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सुरुची साखरे, पूजा वासनिक, श्रेया बिसेन, दिव्या ठाकरे, देवयानी नेतामे, सोनाली नेवारे, निशा कुसराम, सलोनी चांदेकर, जान्हवी येडे, अक्षिदा पटले, प्रिया पटले, दित्या मेश्राम, अश्विनी वरठे व अंजली राऊत या विद्यार्थिनींनी प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. सर्व सहभागी विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. दिशा गेडाम यांनी केले, तर काव्य व कथाकथन उपक्रमाचे संचालन प्रा. रजनी मानकर यांनी केले. प्रा. अरविंद कानतोडे यांनी आभार प्रदर्शन केले. महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



