चंद्रपूरविदर्भ

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ

अतिवृष्टीमुळे रखडलेल्या वेचणीचा विचार करून निर्णय ; मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांकडे आक्रमक मागणीला यश

चंद्रपूर : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेत माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे कापूस खरेदीच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी २७ फेब्रुवारी रोजी संपणारी कापूस खरेदीची अंतिम मुदत आता १५ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयामुळे विदर्भातील, विशेषतः चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

चालू हंगामात राज्याच्या विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीत दीर्घकाळ ओलावा कायम होता. यामुळे कापूस वेचणी आणि काढणीच्या कामाला मोठा विलंब झाला. अनेक शेतकऱ्यांच्या घरात अद्याप कापूस पोहोचलेला नव्हता, तर काहींना कापूस विक्रीसाठी नोंदणी करण्यास अडचणी येत होत्या. २७ फेब्रुवारी ही मुदत अत्यंत कमी असल्याने शेतकरी ‘एमएसपी’ (हमीभाव) लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नी थेट मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारकडे धाव घेतली: राज्य स्तरावर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून परिस्थितीचे गांभीर्य पटवून दिले. केंद्र स्तरावर: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री ना. गिरिराज सिंह यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून मुदतवाढीची आग्रही मागणी केली. प्रशासकीय स्तरावर: ‘सीसीआय’ (भारतीय कपास निगम) मुंबईचे चेअरमन ललितकुमार गुप्ता यांच्याकडेही सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

शेतकऱ्यांच्या हिताचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचे जाहीर आभार मानले आहेत. “अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक संकटात बळीराजाला वाऱ्यावर न सोडता सरकारने संवेदनशीलतेने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आ. मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, वाढीव मुदतीचा लाभ घेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून हमीभावाचा लाभ घ्यावा. तसेच, सीसीआयमार्फत सुरू असलेल्या प्रक्रियेत एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button