
नागपूर : येत्या ६ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस वर्ष २०२६-२७ चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करणार आहेत. राज्याच्या आर्थिक प्रगतीचा हा लेखाजोखा सर्वसामान्य नागरिकांनाही सहजपणे समजावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लिहिलेले “अर्थसंकल्प सोप्या भाषेत” हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे पुस्तक आता अधिकृत संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
योगायोगाची गोष्ट म्हणजे, आजच्याच दिवशी (४ मार्च) २०२० मध्ये नागपूर येथील लाखे प्रकाशनाने या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. अर्थसंकल्पासारखा तांत्रिक आणि क्लिष्ट वाटणारा विषय जनसामान्यांना कळावा, या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी हे लेखन केले आहे. या पुस्तकात अर्थसंकल्पाच्या ए टू झेड (A to Z) प्रक्रियेवर प्रकाश टाकण्यात आला आहे: ऐतिहासिक संदर्भ: ‘बजेट’ शब्दाची उत्पत्ती आणि इतिहास. पारिभाषिक शब्दावली: अर्थसंकल्पात वापरले जाणारे मराठी आणि इंग्रजी तांत्रिक शब्द व त्यांचे अर्थ. संविधानिक तरतुदी: भारतीय संविधानातील अर्थसंकल्पाबाबतची कलमे आणि रचना. प्रशासकीय प्रक्रिया: अर्थसंकल्प तयार होण्याची पद्धत, मंजुरीची प्रक्रिया आणि त्याचे कायद्यात होणारे रूपांतर. विशेष स्पष्टीकरण: अर्थसंकल्पातील पांढऱ्या मुखपृष्ठाचे ‘व्हाईट बुक’ आणि तरतुदींचे विस्तृत विवरण देणारे ‘ग्रीन बुक’ यातील फरक सोप्या भाषेत मांडला आहे.
राज्याच्या एकत्रित निधीतून खर्च करण्याची परवानगी मिळवण्यापासून ते राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७१ (२) (ब) नुसार प्रादेशिक अनुशेष निर्मूलनासाठी राज्यपालांच्या निर्देशानुसार सादर करावयाचा ‘अनुपालन आदेश’ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवरही यात सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. अर्थसंकल्पाविषयीची तुमची समज वाढवण्यासाठी हे पुस्तक खालील लिंकवर उपलब्ध आहे : https://www.devendrafadnavis.in/budget_2020
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाने या पुस्तकाच्या उपयोगाबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले असून, विद्यार्थ्यांनी आणि जिज्ञासू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.



