गडचिरोलीविदर्भ

वैनगंगा नदीपात्रात बुडून तरुण अभियंत्याचा मृत्यू

भंगार वेचून वडिलांनी इंजिनिअर बनवलेला एकुलता एक मुलगा गमावला; दोन महिन्यांपूर्वीच लागला होता नोकरीला

आरमोरी : कष्टकरी पित्याने रक्ताचे पाणी करून, भंगार व्यवसायातून जमविलेल्या पैशातून ज्या मुलाला अभियंता (इंजिनिअर) बनवले, त्याच एकुलत्या एक मुलाचा वैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम नामदेव रामटेके (२५) असे या मृत तरुणाचे नाव असून, अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच त्याला नोकरी लागली होती. गरिबीच्या अंधारातून बाहेर पडून सुखाचे दिवस पाहण्याआधीच रामटेके कुटुंबावर कोसळलेल्या या संकटामुळे संपूर्ण आरमोरी शहरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम सकाळी १० वाजताच्या सुमारास आपल्या काही मित्रांसोबत आरमोरी येथील वैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेला होता. नदीपात्रात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे त्यांना यश आले नाही. काही वेळातच शुभम डोळ्यादेखत नाहीसा झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि मासेमाऱ्यांनी नदीपात्रात शोधमोहीम राबवली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर शुभमचा मृतदेह मासेमाऱ्यांच्या हाती लागला. ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरमोरी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

शुभमचे वडील आरमोरीत भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहून त्यांनी शुभमच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नव्हती. शुभमनेही वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच एका नामांकित कंपनीत नोकरी मिळवली होती. घरात आता समृद्धी येईल, ही आशा बाळगणाऱ्या पित्याचा म्हातारपणाचा एकमेव आधार निसर्गाने हिरावून घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शुभमच्या पश्चात आई, वडील आणि एक बहीण असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button