
सुरक्षा नगर परिसरातील खळबळजनक घटना; भद्रावतीत १५ दिवसांत तिसरी गंभीर कौटुंबिक गुन्हेगारीची नोंद
भद्रावती : शहरातील सुरक्षा नगर भागात चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, भद्रावती पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या पंधरवड्यात कौटुंबिक वादातून घडलेली ही तिसरी मोठी गुन्हेगारी घटना असल्याने शहरात चिंतेचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती दीपक विठ्ठल नागापुरे (५२) हा आपली पत्नी सुवर्णा नागापुरे (४०) हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊन घरात भांडण करत असे. बुधवारी सकाळी त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात दीपकने घरातील चाकू काढून सुवर्णा यांच्या डाव्या गालावर वार केला. या हल्ल्यात सुवर्णा रक्तबंबाळ होऊन जखमी झाल्या.
जखमी सुवर्णा यांना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुवर्णा नागापुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी पती दीपक नागापुरे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अकबर पठाण या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.
गेल्या १५ दिवसांतील घटनांचा आढावा घेतल्यास भद्रावतीत कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी एका भावाने सख्या बहिणीची हत्या करून आईलाही गंभीर जखमी केले होते. शेती विक्रीच्या वादातून मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. आता संशयावरून पत्नीवर झालेल्या हल्ल्याने या मालिकेची व्याप्ती वाढवली आहे.



