गडचिरोलीविदर्भ

जोगनगुडा येथे अग्नितांडव! तीन कुटुंबांचा संसार बेचिराख ; अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडून तातडीची मदत

मध्यरात्रीच्या भीषण आगीत धान्य, कपडे आणि रोख रकमेसह सर्व साहित्य खाक ; जीवितहानी टळली

अहेरी : तालुक्यातील दुर्गम जोगनगुडा (उमानूर) येथे ३ मार्चच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत तीन सख्ख्या भावांचा संसार डोळ्यादेखत जळून खाक झाला. या दुर्दैवी घटनेत घरातील धान्य, कपडे, भांडी आणि रोख रकमेसह आयुष्यभराची पुंजी नष्ट झाली आहे. घटनेची माहिती मिळताच माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तातडीने मदतीचा हात पुढे करत आपदग्रस्त कुटुंबाला मोठा आधार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहेरीपासून ५० किमी अंतरावर असलेल्या जोगनगुडा येथे मलय्या बोरुकुट, प्रसादराव बोरुकुट व नागेश बोरुकुट हे तीन भाऊ एकत्र राहतात. ३ मार्च रोजी रात्री सर्व कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक घराला आग लागली. आगीचा भडका उडताच शेजाऱ्यांनी आरडाओरड करून कुटुंबाला जागे केले. सुदैवाने सर्व सदस्य वेळीच घराबाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, लाकडी बांधकाम आणि ज्वलनशील साहित्यामुळे अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्र रूप धारण केले आणि तीनही कुटुंबांचा संसार खाक झाला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी क्षणाचाही विलंब न करता भाजप तालुका अध्यक्ष विकास तोडसाम व उपाध्यक्ष संजय अलोने यांच्या माध्यमातून आपदग्रस्त बोरुकुट कुटुंबासाठी तात्काळ आर्थिक मदत पाठविली. “आम्ही या संकटाच्या काळात तुमच्या सोबत आहोत,” अशा शब्दांत आत्राम यांनी कुटुंबाला धीर दिला. या संकटसमयी मिळालेल्या मदतीबद्दल बोरुकुट कुटुंबाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.

या घटनेत कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे. याची दखल घेत राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी तहसीलदारांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोगनगुडा गावात सध्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, प्रशासकीय मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“आगीमुळे तीन कुटुंबांचे आयुष्यभराचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने विलंब न करता तात्काळ पंचनामे करून शासनाकडून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून द्यावी.”

— राजे अम्ब्रिशराव आत्राम, माजी राज्यमंत्री.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button