गडचिरोलीविदर्भ

देलनवाडीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे तरुणांना प्रेरक आवाहन ; प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपतींचा आदर्श आजच्या पिढीसाठी दिशादर्शक

आरमोरी : अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा देलनवाडी येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भारावलेल्या वातावरणात पार पडला. ‘शिवसाम्राज्य प्रतिष्ठान’ व समस्त ग्रामवासीय देलनवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याने परिसरातील शिवप्रेमींमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण केले आहे.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व विधिवत पूजन करून करण्यात आले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी महाराजांच्या शौर्याचा आणि दूरदृष्टीचा गौरव केला. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, परकीय सत्तांचा दबाव असतानाही केवळ आपल्या बुद्धिमत्ता आणि रणनीतीच्या जोरावर ‘हिंदवी स्वराज्याची’ पायाभरणी केली. त्यांनी सामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत न्याय, सुरक्षा आणि सन्मानाचा आदर्श राज्यकारभार दिला. महिलांचा सन्मान आणि सर्वधर्मांना समान वागणूक ही त्यांच्या स्वराज्याची मुख्य वैशिष्ट्ये होती.”

आजच्या धावपळीच्या युगात तरुणांनी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ब्राह्मणवाडे यांनी केले. “तरुणांनी शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रभक्तीच्या आधारावर समाजात सकारात्मक बदल घडवावेत. महाराजांचा वारसा जपणे, समाजात एकता, बंधुता आणि स्वाभिमान टिकवून ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

या सोहळ्याला माजी आमदार नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, कृष्णा गजबे, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, शीतल सोमनानी, चंदा कोडवते, नितीन कोडवते, प्रियांका कुमरे, पूनम गुरनुले, शोभा सोमनाणी, डी. के. मेश्राम, भाईचंद गुरनुले, रामदास डोंगरवार, दिलीप कुमरे, माणिक पेंदाम, राहुल धाईत, मनोहरराव तितीरमारे, मिनेश्वर जांभुळे आदी उपस्थित होते.

देलनवाडी येथील या ऐतिहासिक सोहळ्यासाठी केवळ गावकरीच नव्हे, तर आजूबाजूच्या परिसरातील युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे गावात एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा नवा संदेश पोहोचला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button