गडचिरोलीविदर्भ

जिल्ह्यातील धान व मका खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा – माजी आ. कृष्णा गजबे यांची मुख्य सचिवांकडे मागणी

कुरखेडा : महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे ०६ जून रोजी कुरखेडा तालुका दौऱ्यावर आले असता, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्यांबाबतचे एक निवेदन सुपूर्द केले. संपूर्ण जिल्ह्यासह आरमोरी मतदारसंघात रखडलेली फेडरेशनची धान्य खरेदी तात्काळ सुरू करण्याची आग्रही मागणी यावेळी त्यांनी मुख्य सचिवांकडे केली.

कुरखेडा येथील ‘विशेष सर्वेक्षण व सेवा संतुष्टी मोहीम’ (ग्रामपंचायत – गुर्नोली, पंचायत समिती कुरखेडा) अंतर्गत आयोजित शासकीय कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.

मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात माजी आमदार कृष्णा गजबे यांनी नमूद केले की, आरमोरी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धान कापणी होऊन आता महिनाभरापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. काही दिवसांतच आगामी पावसाळी धान लागवडीची (खरिपाची) कामे सुरू होणार आहेत. परंतु, अजूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी अत्यंत आर्थिक अडचणीत सापडला आहे.

संपूर्ण जिल्ह्यात रखडलेली फेडरेशनची धान खरेदी केंद्र तात्काळ प्रभावाने सुरू करण्यात यावीत. मका उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता खरेदीला मुदतवाढ देण्यात यावी, तसेच साठवणुकीसाठी गोदामांची (गाडाऊन) योग्य व्यवस्था करावी. आदिवासी विकास विभागांतर्गत धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करून त्यांचे प्रलंबित कमिशन देण्यात यावे. आरमोरी येथील फेडरेशनअंतर्गत धान्य खरेदी व साठवणुकीसाठी तात्काळ गोदामाची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी.

शेतकऱ्यांची खरीप पूर्व कामे तोंडावर असल्याने आणि त्यांचा आर्थिक कोंडमारा थांबवण्यासाठी आपल्या स्तरावरून संबंधित विभागाला तात्काळ आदेश (निर्देश) देण्यात यावेत, अशी मागणी माजी आमदार गजबे यांनी केली. या भेटीदरम्यान मुख्य सचिवांनी सकारात्मक चर्चा करत या विषयावर योग्य ती प्रशासकीय पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. भेटीप्रसंगी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button