
नगराध्यक्ष सचिन शेंडे आणि पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी स्वतः चालवली सायकल; अपघातांपासून संरक्षणासाठी वाहतूक पोलिसांतर्फे सायकलींना रेडियम वाटप
गोंदिया : ‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा’ आणि ‘सायकल चालवा, सेहत बनवा’ अशा गगनभेदी घोषणांनी गोंदिया शहर दणाणून निघाले. जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून ‘गोंदिया सायकलिंग संडे’ ग्रुपच्या वतीने शहरात एका भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात ८ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ८५ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, समाजातील सर्व वयोगटातील सायकलप्रेमींनी एकत्र येत आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला.
लोकांमध्ये सायकल चालवण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून गोंदिया नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन शेंडे आणि गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी स्वतः सायकल चालवून या रॅलीत सक्रिय सहभाग घेतला.

शहरातील ऐतिहासिक जयस्तंभ चौकातून या रॅलीचा दिमाखदार शुभारंभ झाला. तहसीलदार समशेर पठाण आणि पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी रॅलीला अधिकृतपणे हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. जयस्तंभ चौकातून निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून सुमारे ५ किलोमीटरचे अंतर कापत, ‘फिट इंडिया, हिट इंडिया’चा संदेश देत स्थानिक इंदिरा गांधी स्टेडियमवर पोहोचली, जिथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
गेल्या ९ वर्षांपासून दर रविवारी सायकलिंगच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाची चळवळ चालवणाऱ्या ‘गोंदिया सायकलिंग संडे’ ग्रुपच्या या आवाहनाला शहरवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला. या रॅलीत ५०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये शहरातील नामांकित डॉक्टर, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, पोलीस कर्मचारी आणि शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने खांद्याला खांदा लावून सायकल चालवताना दिसले. रॅलीच्या शेवटी सहभागी सर्व सायकलस्वारांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
समारोप प्रसंगी नागरिकांना संबोधित करताना नगराध्यक्ष सचिन शेंडे म्हणाले की, “सायकल हे पूर्णपणे पर्यावरणपूरक वाहन असून आपल्या वैयक्तिक आरोग्यासाठी अत्यंत उत्तम व्यायाम आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येक शहरवासीयाने आठवड्यातून किमान एक दिवस तरी सायकल चालवली पाहिजे.” वाढत्या प्रदूषणाच्या या काळात लोकप्रतिनिधी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून सायकल चालवल्यामुळे हा उपक्रम गोंदियाकरांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.
सुरक्षेचा उपाय: वाहतूक विभागाकडून सायकलींना ‘रेडियम‘
या रॅलीचे आणखी एक महत्त्वाचे आणि कौतुकास्पद वैशिष्ट्य म्हणजे सायकलस्वारांच्या सुरक्षेची घेतलेली काळजी. रॅली सुरू होण्यापूर्वी गोंदिया वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक सायकलला लाल आणि पांढऱ्या रंगाचे परावर्तित होणारे रेडियम स्टिकर्स लावण्यात आले. रात्रीच्या वेळी किंवा अंधारात सायकल चालवताना समोरून अथवा मागून येणाऱ्या मोठ्या वाहनांच्या प्रकाशात हे रेडियम चमकतात. यामुळे रस्त्यावरून सायकलस्वार जात असल्याचे वाहनचालकांना लांबूनच स्पष्ट दिसेल आणि संभाव्य अपघात टाळता येतील, या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी ही विशेष सुरक्षा मोहीम राबविली.



