
गडचिरोली : एटापल्ली शहर व्यसनमुक्त आणि स्वच्छ करण्याच्या उद्देशाने तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथकाद्वारे शहरातील विविध शासकीय कार्यालयांची आकस्मिक तपासणी करण्यात आली. या मोहिमेत कार्यालयीन वेळेत व्यसन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जरब बसवण्यासोबतच, शहरातील खर्रा विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली.
मुक्तीपथ तालुका स्तरीय समन्वय समितीच्या मागील बैठकीत शासकीय कार्यालये दारू व तंबाखूमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, नगर पंचायत, पंचायत समिती आणि गट शिक्षणाधिकारी कार्यालय यांचे संयुक्त पथकाने शहरात तपासणी केली. विशेष म्हणजे, आजच्या तपासणी दरम्यान एकही अधिकारी किंवा कर्मचारी दारू, तंबाखू किंवा खर्रा सेवन करताना आढळला नाही. दारू सेवन केले आहे का याची तपासणी ब्रेथ अनालायझर वापरुन करण्यात आली. कार्यालयांच्या तपासणीसोबतच पथकाने शहरातील पानठेल्यांची पाहणी केली. यावेळी प्रतिबंधित खर्रा विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर कार्यवाही करून त्यांच्याकडून कोटपा कायद्यानुसार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, एटापल्ली शहराला पूर्णतः व्यसनमुक्त करण्यासाठी ही मोहीम आता प्रत्येक आठवड्यात राबविण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयातील या मोहिमेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लागण्यास मदत होणार असून, सामान्य नागरिकांनीही या मोहिमेचे स्वागत केले आहे. या संयुक्त मोहिमेत पोलिस विभागातर्फे गजानन साखरे (उपपोलीस निरीक्षक), श्रीकांत दुर्गे, संजय मसराम, मोहन शिंदे, मुक्तीपथतर्फे किशोर मलेवार (तालुका संघटक), कु. समीक्षा कूळमेथे (तालुका प्रेरक), महसूल विभागाचे मुरलीधर तुलावी (ग्राम महसूल अधिकारी), रमेश सुमटवार, नगरपंचायतचे विवेक साखरे, ग्रामीण रुग्णालयाचे सुधाकर श्रीरामे (समुपदेशक) यांचा सहभाग होता.



