
सनातन संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा जागर ; प.पू. परमेश्वरदास महाराज आणि ज्येष्ठ प्रचारक रवी भुसारी यांचे मार्गदर्शन
गडचिरोली : धर्म रक्षण, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिवा अधिक तेजाने प्रज्वलित करण्यासाठी तसेच हिंदू समाजाला संघटित करून नव्या ऊर्जेचा संचार करण्याच्या उद्देशाने गडचिरोलीत ‘विराट हिंदू संमेलन’ मोठ्या थाटात संपन्न झाले. सकल हिंदू समाजाच्या वतीने इंदिरानगर येथील नगरपरिषद शाळेजवळील पटांगणात आयोजित या सोहळ्याने सामाजिक एकतेचा नवा संदेश दिला आहे.
या संमेलनाला इस्कॉनचे अध्यक्ष प.पू. परमेश्वरदास महाराज यांचे विशेष आशीर्वाद लाभले. आपल्या आशीर्वचनात त्यांनी सनातन धर्माचे महत्त्व आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्यावर भर दिला. संमेलनाचे प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवीजी भुसारी उपस्थित होते. त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून हिंदू जागरणाची गरज आणि राष्ट्राच्या प्रगतीत समाजाच्या भूमिकेवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच लता समर्थ यांनीही उपस्थितांना संस्कृती संवर्धनाबाबत मोलाचे विचार मांडले.
या भव्य सोहळ्याला सौ. योगिताताई पिपरे (जिल्हाध्यक्ष, भाजप महिला आघाडी), प्रमोद पिपरे (संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे), अनिल कुनघाडकर (बांधकाम सभापती), बाळासाहेब पद्मावार (माजी व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया), मामीडवार, बोलुवार आणि नागरिक, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन संतोष बोलूवार, विक्कि कागदलवार आणि इंदिरानगर-स्नेहनगर वस्तीतील सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले. संमेलनासाठी परिसरातील महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अत्यंत भक्तिमय वातावरणात ‘भारत मातेच्या’ भव्य आरतीने करण्यात आली. या विराट हिंदू संमेलनामुळे गडचिरोली शहरातील हिंदू समाजात एकजुटीची नवी भावना निर्माण झाली असून, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याला गती मिळण्याचे संकेत मिळत आहेत.



