
पोलीस विभाग आणि मुक्तीपथ गाव संघटनेची अहिंसक कृती
देसाईगंज : तालुक्यातील पिंपळगाव हलबी येथे अवैध दारूविक्री विरोधात पोलीस विभाग आणि मुक्तीपथ गाव संघटनेच्या वतीने संयुक्त धाड सत्र राबविण्यात आले. या कारवाईत जंगलात लपवून ठेवलेला १३ ड्रम मोह सडवा आणि दारू गाळण्याचे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.
पिंपळगाव हलबी परिसरात गेल्या काही दिवसांपासून ६ दारूविक्रेते सक्रिय असल्याची माहिती समोर आली होती. मुक्तीपथ गाव संघटनेच्या माध्यमातून या विक्रेत्यांचे प्रबोधन करून अवैध व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, गावकऱ्यांच्या आवाहनाला न जुमानता विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरूच ठेवला. विक्रेत्यांनी आता आपला मोर्चा गावाकडून लगतच्या जंगलाकडे वळवला असून, तिथे हातभट्ट्या लावून दारू गाळली जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती.
या माहितीच्या आधारे देसाईगंज पोलिसांना गावात पाचारण करण्यात आले. पोलीस विभाग, गावचे पोलीस पाटील आणि मुक्तीपथच्या कार्यकर्त्यांनी जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेदरम्यान जंगलात विविध ठिकाणी लपवून ठेवलेला १३ ड्रम मोह सडवा आणि दारू गाळण्याचे इतर साहित्य आढळून आले. पथकाने हा सर्व मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट केला.
या मोहिमेत देसाईगंज पोलीस विभागाचे पीएसआय नायमाने, पोलीस पाटील माधुरी राऊत आणि मुक्तीपथचे तालुका संघटक लेखाराम हुलके, प्रेरक हेमंत मेश्राम तसेच गाव संघटनेचे सदस्य उपस्थित होते. अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.



