क्राईमचंद्रपूरविदर्भ

चंद्रपुरात बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त! ; ९१ लाखांच्या नोटांसह मध्यप्रदेशातील आरोपी जेरबंद

उर्जानगर परिसरातील राजश्री अपार्टमेंटमध्ये सुरू होता काळा बाजार ; कलर प्रिंटर आणि मशिनरी जप्त

चंद्रपूर : चंद्रपूर शहर आणि परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा मोठा कट स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) उधळून लावला आहे. ऊर्जानगर मेजर गेटजवळील एका अपार्टमेंटवर छापा टाकून पोलिसांनी ५०० रुपयांच्या हुबेहूब दिसणाऱ्या तब्बल ९१ लाख १५ हजार रुपयांच्या रंगीत छायांकित नोटा आणि बनावट नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशातील एका मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली असून, पोलीस आता या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १० मार्च रोजी पेट्रोलिंगवर असताना एका गुप्त बातमीदाराने खळबळजनक माहिती दिली. उर्जानगर येथील राजश्री अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर २०३ मध्ये काही व्यक्ती ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करत असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचला. सदर फ्लॅटला कुलूप असल्याने पोलिसांनी फ्लॅट मालक सुमित कालीपथ पॉल याला बोलावून माहिती घेतली. हा फ्लॅट मागील महिन्यापासून मध्यप्रदेशातील काही लोकांनी भाड्याने घेतल्याचे समोर आले.

पंचांच्या समक्ष फ्लॅटचे कुलूप तोडून झडती घेतली असता, बेडरूममध्ये पोलिसांना धक्कादायक दृश्य दिसले. तिथे १० पुठ्ठ्याचे बॉक्स आढळले, ज्यात ५०० रुपयांच्या दराच्या चलनी नोटांप्रमाणे दिसणाऱ्या हुबेहूब रंगीत नोटा भरलेल्या होत्या. यासोबतच एक EPSON कंपनीचे कलर प्रिंटर आणि नोटा छापण्याचे इतर साहित्य असा एकूण ९१,१५,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शुभम दिनेश नागर (वय २६ वर्ष, रा. पंचेड, जि. रतलाम, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. फसवणुकीच्या उद्देशाने या नोटा तयार केल्याची कबुली त्याने दिली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(२), ३१८(३), ३३६(२), ३३६(३), १८२(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गौरव पाटील, एलसीबी प्रमुख अमोल काचोरे, सपोनि दीपक कांकरेडवार, सपोनि बलराम झाडोकर आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांचा समावेश होता.

या कारवाईमुळे बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता असून, या नोटा आतापर्यंत कुठे कुठे चलनात आणल्या गेल्या, याचा तपास आता दुर्गापूर पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button