संतापजनक! शालेय बसमध्ये कंडक्टरची विद्यार्थ्याला अमानुष मारहाण

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह, पालकांकडून कठोर कारवाईची मागणी
अहेरी : शाळा ही शिक्षणाचे आणि संस्काराचे केंद्र मानली जाते, मात्र अहेरी जवळील नागेपल्ली येथील सेंट फ्रान्सिस स्कूलच्या स्कूल बसमध्ये एका चिमुकल्या विद्यार्थ्याला कंडक्टरने अमानुषपणे मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अंश मुकेश नामेवार या विद्यार्थ्याचा गळा दाबून त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला असून, या घटनेमुळे अहेरी परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंश नामेवार हा नेहमीप्रमाणे शाळेतून बसने घरी परतत होता. बसमध्ये तो केवळ बोलत होता, या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या कंडक्टरने त्याच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन कंडक्टरने चक्क त्या लहान मुलाचा गळा दाबून त्याला बेदम मारले. अंशने घरी पोहोचल्यानंतर रडत रडत हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. बसमधील इतर प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांनीही या घटनेची पुष्टी केली असून, या प्रकारामुळे बसमधील इतर लहान मुलेही प्रचंड दहशतीखाली आहेत.
विद्यार्थ्याचे वडील मुकेश नामेवार यांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. “माझ्या मुलाला बसमधील कंडक्टरने अमानुषपणे मारहाण केली आहे. लहान मुलांवर हात उगारणाऱ्या आणि त्यांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा प्रवृत्तीला आम्ही सोडणार नाही,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर शाळा प्रशासनाविरुद्ध प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. पालकांनी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे. “शाळा बसमध्ये चालक आणि वाहक (कंडक्टर) म्हणून प्रशिक्षित आणि जबाबदार व्यक्तींची नियुक्ती का केली जात नाही?” असा सवाल पालक विचारत आहेत. अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना आता सुरक्षिततेची कोणतीही हमी उरली नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
अद्याप या प्रकरणावर सेंट फ्रान्सिस स्कूल प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, स्थानिक नागरिक आणि पालकांनी या नराधम कंडक्टरवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस आणि शिक्षण विभाग यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



