
हॉटेल असोसिएशन आक्रमक; गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास हजारो कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळण्याची भीती
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी (LPG) सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश हॉटेल्सकडे आता केवळ १ ते २ दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्याने हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. गॅस पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास जिल्ह्यातील हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येईल, गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने कंपन्यांशी समन्वय साधावा, अन्यथा हॉटेल व्यावसायिकांना आंदोलनाचे पाऊल उचलवे लागेल असा इशारा हॉटेल असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.
हॉटेल उद्योग हा पूर्णपणे गॅसवर अवलंबून आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख गॅस एजन्सीकडे सध्या कमर्शियल सिलेंडरचा साठा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी इमर्जन्सी स्टॉकही संपल्याने स्वयंपाक कसा करावा, असा प्रश्न हॉटेल मालकांसमोर उभा ठाकला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी (ADSO) यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे यांनी यावेळी प्रशासनाचे लक्ष वेधले की, जर गॅसअभावी हॉटेल्स बंद पडली, तर त्याचा थेट फटका केवळ मालकांनाच नाही, तर या उद्योगावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांना बसेल. स्वयंपाकी, वेटर, साफसफाई कर्मचारी बेरोजगार होतील, ज्यामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.
या शिष्टमंडळात चंद्रकांत पतरंगे (सिटी हार्ट गार्डन) यांच्यासह निखिल बरछा (हॉटेल सत्कार), जग्गू सुचक (हॉटेल जलाराम), पवन सुचक (हॉटेल रामायण), जागेश बिसेन (बाबूजी का ढाबा), समीर वडोदकर (हॉटेल पूर्णब्रह्म), मुरारी तिवारी (टॉस कॅफे) आणि अतुल चांगलानिया (गुजराती मिठाई घर) यांचा समावेश होता. वरच्या स्तरावरून पुरवठा खंडित झाल्याचे सांगितले जात असले तरी, प्रशासनाने स्थानिक पातळीवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.



