
जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी स्वतः गॅस एजन्सीवर जाऊन घेतली परिस्थितीची दखल ; लूट करणाऱ्यांवर होणार कारवाई
भंडारा : सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन कोणत्याही एजन्सीने ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करू नये, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिले आहेत. “नागरिकांना नियमानुसार आणि वेळेत गॅस उपलब्ध करून देणे ही एजन्सींची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी ग्राहकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
केवळ बैठकांवर न थांबता, जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी स्वतः भंडारा शहरातील गॅस एजन्सीला प्रत्यक्ष भेट देऊन वितरणाच्या सद्यस्थितीची पाहणी केली. ग्राहकांशी संवाद साधून त्यांनी गॅस वितरणात पारदर्शकता ठेवण्याचे आदेश दिले. एचपीसीएल (HPCL), आयओसीएल (IOCL) आणि बीपीसीएल (BPCL) या तिन्ही कंपन्यांच्या सेल्स ऑफिसर्सचीही लवकरच बैठक घेऊन पुरवठा साखळी अधिक मजबूत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील २४ गॅस एजन्सी धारकांनी आपल्या समस्या मांडल्या. युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून, एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाल्याने सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याची माहिती त्यांनी दिली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, तांत्रिक अडचणी असल्या तरी सामान्य नागरिकांना वेळेत सेवा मिळालीच पाहिजे आणि कोणताही अतिरिक्त दर आकारला जाऊ नये.
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यासाठी संपर्क अधिकारी नियुक्त केले आहेत. गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबत काही अडचण किंवा तक्रार असल्यास नागरिकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा: जिल्हा प्रशासन हेल्पलाईन क्रमांक: ०७१८४-२५००४०
या बैठकीमुळे गॅस टंचाईबाबत निर्माण झालेला गोंधळ कमी होण्यास मदत होणार असून, प्रशासनाच्या या भूमिकेमुळे काळाबाजार करणाऱ्यांवर वचक बसणार आहे.



