गडचिरोलीविदर्भ

भाट समाज महिला संघटनेचा हळदी-कुंकू सोहळा उत्साहात ; नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांची प्रमुख उपस्थिती

सांस्कृतिक कार्यक्रमातून उमटले महिला सक्षमीकरणाचे सूर

गडचिरोली : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भाट समाज महिला संघटना, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने तीळसंक्रांतीचे औचित्य साधून हळदी-कुंकू समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांमधील सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेच्या वतीने नगराध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी विराजमान होत्या.

हळदी-कुंकू समारंभानंतर महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी पारंपारिक आणि प्रेरणादायी गीतांवर नृत्य सादर केले. विस्मरणात जात असलेल्या पारंपारिक खेळांमुळे कार्यक्रमात वेगळीच रंगत आली. विविध खेळांच्या माध्यमातून महिलांनी आनंद लुटला आणि दैनंदिन कामातून विरंगुळा मिळवला.

याप्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर म्हणाल्या, “अशा सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे केवळ सण साजरे होत नाहीत, तर महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. समाजात एकतेची भावना दृढ करण्यासाठी महिला संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिलांनी एकत्र येऊन सामाजिक कार्यात अधिक सक्रिय सहभाग नोंदवावा.”

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भाट समाज महिला संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांच्या प्रतिसादाने हा सोहळा संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांतर्फे सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button