कृषी विभागाच्या वतीने १५ प्रगतशील शेतकरी परदेश अभ्यास दौऱ्यावर रवाना

मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्समध्ये आधुनिक शेतीचा होणार अभ्यास; २०१९ नंतरचा पहिलाच दौरा
पुणे : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य कृषी विभागाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘शेतकरी परदेश अभ्यास दौरा’ योजनेअंतर्गत राज्यातील १५ प्रगतशील शेतकऱ्यांचा पहिला गट १७ जानेवारी रोजी मलेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्स या देशांच्या दौऱ्यावर रवाना झाला आहे.
दौरा प्रस्थान करत असताना राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सहभागी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. “परदेशातील आधुनिक शेती, प्रक्रिया उद्योग आणि विपणन व्यवस्थेचा सखोल अभ्यास करून तो अनुभव आपल्या राज्यातील इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. हा दौरा राज्याच्या कृषी विकासाला नवी दिशा देणारा ठरेल,” असे आवाहन कृषीमंत्र्यांनी यावेळी केले.
या दौऱ्यामध्ये राज्यातील १५ प्रगतशील शेतकरी, कृषी विभागाचा १ वरिष्ठ अधिकारी आणि प्रवासी कंपनीचा १ प्रतिनिधी अशा १७ जणांच्या पथकाचा समावेश आहे. या पथकाने पुणे येथून मुंबई मार्गे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रस्थान केले. सन २०१९ नंतर कृषी विभागाने पुन्हा एकदा ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
या १०-१२ दिवसांच्या दौऱ्यात शेतकरी प्रामुख्याने आधुनिक शेती पद्धती: कमीत कमी पाण्याचा आणि खतांचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन. संरक्षित शेती (Protected Farming): पॉलिहाऊस आणि शेडनेटमधील प्रगत तंत्रज्ञान. कृषी प्रक्रिया उद्योग: शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन कसे करावे? निर्यातक्षम उत्पादन: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत माल विक्रीसाठी लागणारे तांत्रिक निकष. विपणन व्यवस्था: जागतिक स्तरावरील शेती मालाची विक्री आणि साखळी व्यवस्थापन. या बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास करतील.
२०१९ नंतर प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या दौऱ्यामुळे राज्यातील शेती अधिक उत्पादनक्षम आणि शाश्वत होण्यास मदत होणार आहे. परदेशातील शेती व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन परतलेले हे शेतकरी ‘प्रशिक्षक’ म्हणून ग्रामीण भागात काम करतील, ज्यामुळे स्थानिक स्तरावर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यास वेग येईल.



