
गडचिरोलीत राज्य शिक्षक परिषदेचे ३२ वे जिल्हा अधिवेशन उत्साहात ; माजी खा. अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन
गडचिरोली : “शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन असून शिक्षक हा त्या परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. बदलत्या जागतिक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी टिकून राहावे यासाठी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि अध्यापन पद्धतींचा अंगीकार करून सक्षम नागरिक घडवावेत,” असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित ३२ वे गडचिरोली जिल्हा अधिवेशन रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायभवन कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाले, त्याप्रसंगी ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या अधिवेशनाचे उद्घाटन माजी खासदार अशोक नेते यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल नुतीलकंठावार होते. स्वागताध्यक्ष या नात्याने आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थितांचे स्वागत करताना शिक्षक परिषदेच्या रचनात्मक कार्याचा गौरव केला.
यावेळी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून माजी आमदार तथा राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजा चौधरी, माजी आमदार देवराव होळी, समाज कल्याण विभागाचे सहआयुक्त डॉ. सचिन मडावी उपस्थित होते.
अधिवेशनादरम्यान विविध सत्रांमध्ये शिक्षकांच्या समस्या आणि शैक्षणिक धोरणांवर सखोल चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर विचारमंथन झाले: नवीन शैक्षणिक धोरण (NEP): धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यातील शिक्षकांची भूमिका. गुणवत्ता वृद्धी: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा बौद्धिक व कौशल्य विकास साधण्यासाठी राबवायचे उपक्रम. शिक्षक समस्या: जुनी पेन्शन योजना, अशैक्षणिक कामे आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा. तंत्रज्ञान: डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज.
नागपूर विभागाचे अध्यक्ष अजय वानखेडे, कार्यवाह सुभाष गोतमारे आणि कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी संघटनात्मक बांधणीवर मार्गदर्शन केले. जिल्हयातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या हजारो शिक्षक प्रतिनिधींमुळे न्यायभवन परिसर गजबजून गेला होता. या अधिवेशनामुळे शिक्षकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या अधिवेशनामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, शिक्षण क्षेत्राला एक नवी आणि सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.



