
तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे समायोजन करा आणि अशैक्षणिक कामांचा बोजा थांबवा ; जुन्या पेन्शनसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार
गोंदिया : “शिक्षक हा समाजाचा कणा आहे, परंतु सध्या शासन केवळ घोषणाबाजीत गुंतले आहे. शिक्षकांच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष होत असेल, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारणे हाच एकमेव पर्याय उरतो. ‘विमाशी’ने नेहमीच संघर्षातून न्याय मिळवून दिला असून, यापुढेही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरची लढाई सुरूच राहील,” असा निर्धार विधानपरिषद सदस्य तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे (विमाशी) सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केला.
गोंदिया येथील लिटिल फ्लॉवर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित विमाशीच्या जिल्हा अधिवेशनात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाला प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष डी. एस. हुकरे, समीर बैस, निरज कटकवार, शिला बिसेन यांसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अडबाले यांनी शिक्षकांच्या प्रलंबित समस्यांवर सविस्तर भाष्य केले. तासिका तत्त्व शिक्षक: १० वर्षांहून अधिक काळ सेवा झालेल्या तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे तातडीने समायोजन करावे आणि त्यांना नियमित मानधन मिळावे. अशैक्षणिक कामे: मराठी माध्यमाच्या शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यादानाचे नुकसान होत आहे. शिक्षकांनी केवळ शिकवण्याचे कार्य करावे, यासाठी संघटना आग्रही आहे. टीईटीचा प्रश्न: इयत्ता १ ली ते ८ वीच्या शिक्षकांचा टीईटी संदर्भातील प्रश्न विधिमंडळात मांडला असून, त्यावर सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. जुनी पेन्शन योजना: शासनाने केलेली घोषणा अपुरी असून, सर्वच शिक्षकांना जुनी पेन्शन लागू होईपर्यंत संघर्ष सुरू राहील. असेही ते म्हणाले.
या अधिवेशनाचे उद्घाटन माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील विस्कळीतपणावर चिंता व्यक्त केली. नगर परिषद गोंदियाचे नगराध्यक्ष सचिनभाऊ शेंडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त नगरसेवक सुरेंद्र अडबाले आणि नगराध्यक्ष सचिन शेंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सचिन राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन रेश्मा बिसेन यांनी केले. या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष ओ. एस. गुप्ता, जिल्हा कार्यवाह संदीप मांढरे आणि विमाशीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या अधिवेशनामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये एकजुटीची नवी ऊर्जा संचारली आहे



