अतिदुर्गम ‘तुमरकोठी’त ७९ वर्षांनंतर पोहोचली एसटी! ; गडचिरोली पोलिसांच्या प्रयत्नाने दुर्गम भागात विकासाची नवी पहाट

पारंपारिक नृत्याने आणि तिरंगा फडकवत गावकऱ्यांनी केले बसचे स्वागत ; भामरागड-अहेरी मार्गावर दळणवळणाची सुविधा उपलब्ध
गडचिरोली : जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि माओवादग्रस्त भागातील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी पोलीस दलाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतर प्रथमच, भामरागड तालुक्यातील मौजा तुमरकोठी ते अहेरी या मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू करण्यात आली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी या बससेवेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
भामरागडपासून ३० किमी आणि अहेरीपासून १०० किमी अंतरावर असलेल्या तुमरकोठी गावात पहिल्यांदाच बस आल्याने गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्ये वाजवत आणि नृत्य करत बसचे स्वागत केले. विशेष म्हणजे, शाळेतील लहान मुलांनी हातात तिरंगा घेऊन ‘लालपरी’चे स्वागत केल्याने परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
पोस्टे तुमरकोठीचे प्रभारी अधिकारी पोउपनि. गोरखनाथ सुरासे यांनी हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली. या बससेवेमुळे तुमरकोठी, कोठी, भामरागड आणि अहेरी या पट्ट्यातील सुमारे ४५० ते ५०० नागरिकांची पायपीट थांबणार आहे. विशेषतः विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरात येणे आता सहज शक्य होणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री लेकामी, गावपाटील रामजी मट्टामी, चिन्ना मट्टामी, राजु गावडे, शिक्षक रामा लेकामी यांच्यासह सुमारे ३०० नागरिक उपस्थित होते. या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी. आणि विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपीएफ १९१ बटालीयन आणि तुमरकोठी पोलीस ठाण्याच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.
गडचिरोली पोलीस दलाने केवळ कायदा-सुव्यवस्थाच नव्हे, तर दळणवळणाच्या प्रश्नावरही मोठी कामगिरी केली आहे. मागील एक वर्षात: नवीन बस सेवा: गट्टा (जा.)-गर्देवाडा-वांगेतुरी, कटेझरी-गडचिरोली, मरकणार-अहेरी आणि आंबेझरी-गडचिरोली या मार्गांवर प्रथमच बस सुरू करण्यात आली. पायाभूत सुविधा: पोलीस संरक्षणात जिल्ह्यात ५५९ मोबाईल टॉवर्स, ४२४ किमीचे रस्ते आणि ६५ पुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
दुर्गम भागातील हे ‘परिवर्तन’ केवळ प्रवासाची सोय नसून, विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले गेलेले एक भक्कम पाऊल आहे, अशी भावना तुमरकोठीच्या गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.



