भंडाराविदर्भ

अनधिकृत गॅस गोदामाचा पर्दाफाश ; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या छाप्यात ५७ सिलिंडर जप्त

एमआयडीसी परिसरातील पिरॅमिड गॅस एजन्सीवर कारवाई ; विनापरवाना साठा केल्याने गोदामाला ठोकले ‘सील’

भंडारा : भंडारा एमआयडीसी परिसरात अनधिकृतपणे गॅस सिलिंडरची साठवणूक करणाऱ्या पिरॅमिड गॅस एजन्सीच्या गोदामावर जिल्हा पुरवठा विभागाने धडक कारवाई केली. १६ मार्च रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास टाकलेल्या या छाप्यात घरगुती आणि व्यावसायिक वापराचे एकूण ५७ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून, सदर गोदामाला प्रशासनाने सील ठोकले आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गोदामाची तपासणी केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. गोदामाच्या बाहेर एजन्सीच्या नावाचा कोणताही फलक नव्हता. तसेच, ज्वलनशील गॅस सिलिंडरची साठवणूक करण्यासाठी आवश्यक असलेला विस्फोटक विभागाचा (Explosives Department) अधिकृत परवाना एजन्सीकडे नसल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले.

तपासणी दरम्यान गोदामात विविध वजनाचे ५७ सिलिंडर आढळले: घरगुती (१४.२ किलो): ४० रिकामे सिलिंडर. व्यावसायिक (१९ किलो): ८ रिकामे सिलिंडर. घरगुती (१० किलो): २ भरलेले आणि १ रिकामा सिलिंडर. इतर छोटे (५ किलो): ५ रिकामे आणि १ भरलेला सिलिंडर. एजन्सीच्या वाहनचालकाने बॅटरी डाऊन झाल्याचे कारण पुढे केले असले तरी, मोठ्या प्रमाणातील साठा पाहता येथून अनधिकृत विक्री होत असल्याचा संशय प्रशासनाने व्यक्त केला आहे.

जप्त केलेला सर्व मुद्देमाल त्याच गोदामात ठेवून पुरवठा विभागाने गोदामाला कुलूप ठोकून सील केले आहे. “पुरवठा विभागाच्या लेखी परवानगीशिवाय हे सील उघडू नये,” अशा कडक सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या कारवाईचा सविस्तर प्रस्ताव आता पुढील कारवाईसाठी संबंधित ऑईल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी सांगितले.

या मोहिमेत जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, खरेदी अधिकारी सुहास टोंग, निरीक्षक रोशन कापसे, पोचीराम कापडे, रवींद्र उन्हाळे आणि धीरज मेश्राम यांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button