गडचिरोलीविदर्भ

बालकांचे हक्क जपण्यासाठी ‘ग्राम बाल संरक्षण समिती’ सक्रिय व्हावी – तहसीलदार सागर कांबळे

तालुकास्तरीय बाल संरक्षण समितीची बैठक ; ‘सुरक्षित समुदाय’ उपक्रमांतर्गत २५ गावांचा तीन वर्षांचा अहवाल सादर

गडचिरोली : “बालकांचे संगोपन आणि सुरक्षा ही केवळ शासनाची जबाबदारी नसून, ग्राम स्तरावरील बाल संरक्षण समित्यांनी अत्याचार रोखण्यासाठी पूर्वतयारी म्हणून कार्य करणे आवश्यक आहे. गाव पातळीवर न सुटणारे बालकांचे प्रश्न तालुका स्तरावर मांडावे, प्रशासन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन तहसीलदार सागर कांबळे यांनी केले.

क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके सभागृह, पंचायत समिती गडचिरोली येथे आयोजित तालुकास्तरीय बाल संरक्षण समितीच्या विशेष आढावा बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या बैठकीस बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) सिंधू गाडगे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष दिनेश बोरकुटे, चाईल्ड समन्वयक देवेंद्र मेश्राम, ‘स्पर्श’ संस्थेचे प्रमोद चिंतलवार, आशा वरघंटे, शालिना पेंदोर आणि २५ गावांतील पोलीस पाटील, सरपंच, आशा वर्कर व समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या प्रास्ताविकेच्या वाचनाने करण्यात आली.

‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्था (कुरखेडा) आणि ‘लेहर’ संस्था यांच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील २५ गावांमध्ये ‘सुरक्षित समुदाय जेथे बालपण आनंदी’ ही पायलट प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रकल्पाच्या गेल्या तीन वर्षांतील कार्याचा सविस्तर आढावा डॉ. सतीश गोगुलवार (संचालक, आम्ही आमच्या आरोग्यासाठी) यांनी ‘पीपीटी’ सादरीकरणाद्वारे मांडला.

बैठकीत मार्गदर्शन करताना सहाय्यक गटविकास अधिकारी बेडके यांनी ग्राम बाल संरक्षण समितीच्या सदस्यांना आश्वस्त केले की, मुलांच्या पायाभूत सुविधा आणि हक्कांच्या रक्षणासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा. बालकांचे हक्क आणि कर्तव्ये सांगून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे जयंत जथाडे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, “ग्राम बाल संरक्षण समितीचा मूळ उद्देश गावाचा विकास नसून, ० ते १८ वयोगटातील बालकांचे संगोपन आणि संरक्षण करणे हा आहे.” त्यांनी अत्याचार होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय करणे, बाल संगोपन योजनेची माहिती देणे आणि १०९८ चाईल्ड हेल्पलाईन या २४ तास उपलब्ध असलेल्या सेवेचा वापर करण्यावर भर दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन मडावी यांनी केले. सिंधू गाडगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी नितीन खोब्रागडे, पल्लवी चौधरी, अविनाश लाडे आणि ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button