गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उभारले ‘बंगाडी’ पोलीस मदत केंद्र

छत्तीसगड सीमेवर १००० जवानांच्या फौजेने पूर्ण केले मिशन ; सुरक्षा पोकळी भरून काढण्यासाठी मैलाचा दगड, दुर्गम भागात आता धावणार ‘लालपरी’

भामरागड : गडचिरोली पोलीस दलाने आपल्या अचाट कार्यक्षमतेचा पुन्हा एकदा प्रत्यय देत, माओवादाच्या छायेत असलेल्या अतिदुर्गम ‘बंगाडी’ येथे नवीन पोलीस मदत केंद्राची अत्यंत दिमाखात स्थापना केली आहे. छत्तीसगड सीमेपासून अवघ्या २ किमी अंतरावर असलेल्या या भागात विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी, १००० हून अधिक जवानांच्या फौजेने केवळ २४ तासांच्या आत हे केंद्र उभारून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

हे मदत केंद्र उभारण्यासाठी पोलीस दलाने युद्धपातळीवर नियोजन केले होते. यामध्ये १०५० पोलीस मनुष्यबळ, ४ जेसीबी, ८ ट्रेलर, २ पोकलेन आणि २० ट्रक्सच्या सहाय्याने हे अशक्य वाटणारे काम पूर्ण करण्यात आले. पायाभूत सुविधा: केंद्रात १५ पोर्टा कॅबिन, वायफाय सुविधा, जनरेटर शेड आणि आरओ (RO) वॉटर प्लांट कार्यान्वित करण्यात आले आहेत. संपर्क यंत्रणा: दुर्गम भागाला जगाशी जोडण्यासाठी लवकरच येथे मोबाईल टॉवर उभारले जाणार आहेत. कडक सुरक्षा: ३ अधिकारी, ५५ अंमलदार, एसआरपीएफच्या २ प्लाटून, सीआरपीएफची १ तुकडी आणि विशेष अभियान पथकाचे (C-60) २०० कमांडो या केंद्राच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. सुरक्षेसाठी ‘मॅक वॉल’ आणि बुलेटप्रूफ (P.) मोर्चेही उभारण्यात आले आहेत.

२०२३ पासून जिल्ह्याची ‘सुरक्षा पोकळी’ भरून काढण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेतील हे ११ वे नवीन पोलीस मदत केंद्र आहे. बंगाडी येथील केंद्रामुळे आता गुंडेनूर नाल्याचे काम, राष्ट्रीय महामार्ग आणि पुलांच्या बांधकामाला मोठी गती मिळणार आहे. यामुळे भविष्यात या भागात थेट ‘एस.टी. बस’ पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्राच्या उद्घाटनानिमित्त आयोजित जनजागरण मेळाव्यात ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ) संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी हजारो ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले: महिलांना साड्या आणि पुरुषांना धोतर व ब्लँकेटचे वाटप. युवकांना खेळाचे साहित्य आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. पोलिसांच्या या ‘मैत्री’च्या उपक्रमामुळे आदिवासी बांधवांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या ऐतिहासिक सोहळ्याला अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., एसडीपीओ अमर मोहिते आणि बंगाडी केंद्राचे प्रभारी अधिकारी पोउपनि. अकोश पुयाड यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. गडचिरोली पोलीस दलाच्या या साहसी पावलामुळे माओवाद्यांच्या हालचालींवर वचक निर्माण होणार असून, खऱ्या अर्थाने विकासाची द्वारे या दुर्गम भागासाठी उघडली गेली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button