गडचिरोलीविदर्भ

जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात; सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

विविध विभागांच्या प्रदर्शनीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद ; ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडून हक्क आणि कर्तव्यांचे मार्गदर्शन

गडचिरोली : “बदलत्या काळात बाजारपेठ विस्तारत असताना ग्राहकांनी केवळ वस्तू खरेदी न करता तिची गुणवत्ता, किंमत आणि सुरक्षेबाबत जागरूक राहणे काळाची गरज आहे. ‘ग्राहक राजा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी हक्कांसोबतच कर्तव्याची जोड हवी,” असे प्रतिपादन मान्यवरांनी जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या प्रतिभा पाटील आणि माजी अध्यक्ष सादिक झवेरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून ग्राहक तहसीलदार कांबळे, आयोगाच्या सदस्य माधुरी आटमांडे, सायबर सेलच्या पोलीस उपनिरीक्षक नेहा हांडे, जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे अशासकीय सदस्य चंद्रशेखर भडांगे, प्रविण घाटे, सुरज मेश्राम, ग्राहक पंचायतचे जिल्हा संघटक उदय धकाते, ग्राहक समितीचे जिल्हा अध्यक्ष विजय चाटे, कमलेश तुमसरे आदींसह कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी आणि ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केले. या आधुनिक युगात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढल्याने सायबर फसवणुकीचे धोकेही वाढले आहेत. याबाबत मार्गदर्शन करताना सायबर सेलच्या पी.एस.आय. नेहा हांडे यांनी अत्यंत मोलाची माहिती दिली. ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी आणि अशा प्रसंगी तातडीने कोणत्या उपाययोजना कराव्यात, याचे तंत्र त्यांनी विद्यार्थी आणि नागरिकांना समजावून सांगितले.

माजी अध्यक्ष सादिक झवेरी यांनी ग्राहकांना आवाहन केले की, जर कुठल्याही व्यवहारात ग्राहकावर अन्याय झाला असेल, तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवावी. तक्रार केल्यास कायदेशीर चौकटीत राहून ग्राहकांना न्याय मिळवून देणे सुलभ होते, असे त्यांनी नमूद केले.

ग्राहक हक्क दिनाचे औचित्य साधून नागरिकांच्या प्रबोधनासाठी विविध विभागांनी प्रदर्शनी लावली होती. यामध्ये: अन्न व औषध प्रशासन: भेसळ कशी ओळखावी याबाबत माहिती. वैधमापन शास्त्र: वजन व मापांमधील अचूकतेचे महत्त्व. कृषी विभाग व गॅस एजन्सी: खते, बियाणे आणि गॅस वापराबाबत सुरक्षा. यासह प्रादेशिक परिवहन विभाग (RTO), BSNL यांनीही आपल्या सेवा आणि ग्राहकांच्या हक्कांचे दालन उभारले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपचंद फुलझेले यांनी केले, तर आभार अश्विनी आसवले यांनी मानले. या प्रदर्शनीला गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, या उपक्रमामुळे ग्राहकांमध्ये आपल्या हक्कांप्रती नवी जाणीव निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button