गडचिरोलीविदर्भ

देसाईगंजमध्ये श्री साई पालखी सोहळ्याचा भक्तीमय जल्लोष

पोरेड्डीवार आणि गजबे यांनी खांद्यावर घेतली पालखी ; दिल्ली-वृंदावन आणि कानपूरच्या अघोरी झाकींनी वेधले भाविकांचे लक्ष.

देसाईगंज : श्री रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून देसाईगंज येथील हनुमान वार्ड/राजेंद्र वार्ड स्थित श्री साई बाबा मंदिरातून निघालेल्या भव्य पालखी सोहळ्याने शहर भक्तीरसात न्हाऊन निघाले. या सोहळ्यात सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार आणि आरमोरी विधानसभेचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी प्रत्यक्ष पालखी खांद्यावर घेऊन भक्तीपूर्ण सहभाग नोंदवला. त्यांच्या या सहभागामुळे उपस्थित भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

१९ मार्च रोजी संध्याकाळी ४ वाजता श्री साई पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे दिल्ली-वृंदावन समूहाची विशेष झाकी आणि कानपूर येथील समूहाने सादर केलेली ‘महाकाल-अघोरी’ झाकी होती. या नेत्रदीपक सादरीकरणामुळे पालखी मार्गावर भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. तसेच, मंदिरात सुरू असलेल्या संगीतमय शिवमहापुराण कथेने या संपूर्ण उत्सवात आध्यात्मिक रंग भरले.

पालखी ज्या ज्या मार्गावरून गेली, त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी आणि साई भक्तांनी प्रकाश पोरेड्डीवार व कृष्णा गजबे यांचे पुष्पहार घालून जंगी स्वागत केले. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील या दिग्गज मान्यवरांनी सामान्य भाविकांच्या सुरात सूर मिसळून पालखी ओढल्याने त्यांच्या धार्मिक आस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“साई बाबांचे विचार आणि रामाचा आदर्श हाच समाजाला जोडणारा दुवा आहे,” अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. पालखी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी श्री साई बाबा मंदिर समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. देसाईगंज शहरात निघालेल्या या भव्य सोहळ्याने धार्मिक पर्यटनाला आणि सामाजिक ऐक्याला मोठी चालना मिळाली आहे. साई नामाचा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात पार पडलेल्या या सोहळ्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button