
नगरपंचायत व वनविभागाच्या भूमिकेवर ग्रामस्थ संतप्त
गडचिरोली : जिल्ह्याच्या पूर्वोत्तर भागातील जंगलाने वेढलेल्या कोरची गावात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अवघ्या चार दिवसांच्या अंतरात बिबट्याने दोन वासरांचा बळी घेतल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असून, संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वारंवार मागणी करूनही नगरपंचायत प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यामुळेच बिबट्याचा वावर मानवी वस्तीत वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कोरची येथील वॉर्ड क्रमांक १३ मध्ये वास्तव्यास असलेल्या वामन मोहुर्ले यांच्या घराजवळ बिबट्याने हल्ला चढवला. १७ मार्च आणि त्यानंतर पुन्हा २० मार्च रोजी बिबट्याने दोन वासरांना लक्ष्य केले. या हल्ल्यात दोन्ही वासरे गंभीर जखमी होऊन दगावली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाऊलखुणांच्या (पगमार्क) पाहणीनंतर हा हल्ला बिबट्यानेच केल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तवला आहे.
कोरची गाव जंगलाला लागून असल्याने येथे हिंस्त्र प्राण्यांचा वावर नेहमीचाच आहे. मात्र, सध्या गावात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरत आहेत. या मोकाट जनावरांच्या शोधात बिबट्या गावाच्या मुख्य वस्तीपर्यंत पोहोचत आहे. मोकाट जनावरांना शिकार केल्यानंतर आता बिबट्याने गोठ्यातील पाळीव प्राण्यांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत.
“गावातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून त्यांना गोशाळेत पाठवावे,” या मागणीसाठी ग्रामस्थांनी यापूर्वीच नगरपंचायतीला निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. “जर वेळेवर मोकाट जनावरांचा प्रश्न सुटला असता, तर बिबट्याला मानवी वस्तीत येण्यासाठी भक्ष्य मिळाले नसते,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे भविष्यात मानवी जिवाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नगरपंचायतीने मोकाट जनावरांच्या प्रश्नावर ठोस पावले उचलावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोरचीवासीयांनी दिला आहे.



