गडचिरोलीविदर्भ

‘गीतांमधून समता, बंधुता व स्वातंत्र्याचा संदेश’ ; ‘शिवराय ते भीमराव’ सांस्कृतिक पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद”

संविधानाच्या ७५ वर्षांनिमित्त व महाड क्रांती शताब्दी वर्षानिमित्त समाज कल्याण विभागाचा उपक्रम

गडचिरोली : भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त तसेच महाड क्रांतीच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत गडचिरोली शहरातील संविधान चौक येथे ‘शिवराय ते भीमराव’ या संकल्पनेवर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी गीतांमधून सामाजिक समता, बंधुता व स्वातंत्र्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत अध्यक्षस्थानी होते. सामाजिक कार्यकर्ते दादाजी चाफले, किशोर वडेट्टीवार, नगरसेवक सीमा कन्नमवार, सतीश विधाते, बाळू टेंभुर्णे, हंसराज उंदिरवाडे, धर्मानंद मेश्राम आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रसिद्ध गायक, चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी आपल्या १५ कलाकारांच्या टीमसह सुमारे तीन तासांच्या या कार्यक्रमात सुरेल व प्रेरणादायी गीतांचे सादरीकरण केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या या गीतांनी सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्वाचे मूल्य प्रभावीपणे मांडले. तसेच महाराष्ट्रातील विविध समाजसुधारकांच्या कार्यावर आणि महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहावरही प्रकाश टाकण्यात आला. मुंबई येथील डॉ. कोमल धांडे, नेहा गाडे तसेच लातूर येथील धम्मा तिगोटे यांनीही आपल्या गायनातून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

उद्घाटनप्रसंगी डॉ. सचिन मडावी यांनी संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त शासनामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. संविधानाच्या उद्देशिकेच्या फ्रेम केलेल्या प्रती प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम सुरू असून नागरिकांनी त्या आपल्या घरात लावाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणात रोहिदास राऊत यांनी संविधानातील मूल्यांचा प्रसार अधिक प्रभावीपणे व्हावा यासाठी सार्वजनिक ठिकाणी उद्देशिकेचे स्तंभ उभारण्याची गरज व्यक्त केली व या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत रंगारी यांनी केले तर आभार प्रदर्शनही त्यांनीच मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धार्थ गोवर्धन, नागसेन खोबरागडे, अंकुश शेडमाके, राज मराठे, चेतन रामटेके आदींनी विशेष परिश्रम घेतले. या सांस्कृतिक पर्वाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रत्येक सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button