
पाणी काढताना तोल गेल्याने अपघात; बादलीचा दोर अंगाला गुंडाळल्याने मृत्यूशी झुंज अपयशी
आष्टी : आष्टी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, घरासमोरील विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन पडल्याने एका ३३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबाचा एकमेव आधार हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रीकांत (सोनू) नानाजी दुर्गे (वय ३३ वर्षे, रा. आष्टी) असे मृत तरुणाचे नाव आहे. श्रीकांत हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी सायंकाळी ते आपल्या घरासमोरील विहिरीतून बादलीच्या साह्याने पाणी उपसत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट विहिरीच्या खोल पाण्यात कोसळले.
विहिरीत पडल्यानंतर श्रीकांत यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला असावा, मात्र दुर्दैवाने बादलीचा दोर त्यांच्या अंगालाच गुंडाळला गेला. यामुळे त्यांना हालचाल करणे कठीण झाले आणि त्यांना बाहेर येण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. पाण्यात बुडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन आष्टी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. श्रीकांत यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या गरीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील उघड्या आणि असुरक्षित विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. अनेक विहिरींना संरक्षक कठडे किंवा जाळ्या नसल्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत. संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी गावागावांतील विहिरींना सुरक्षा कवच देण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहेत.



