गडचिरोलीमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

उच्च शिक्षण विभागातील विविध प्रश्न प्रलंबित ; आ. अडबाले यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन वेधले लक्ष

गडचिरोलीत ‘सहसंचालक उच्च शिक्षण‘ कार्यालयाची निर्मिती करण्याची मागणी ; डीसीपीएस (DCPS) आणि पेन्शन योजनांच्या अंमलबजावणीसाठी निवेदनाद्वारे साकडे

मुंबई/गडचिरोली : राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्रलंबित समस्या आणि प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आमदार सुधाकर अडबाले यांनी विधान भवन येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली. यावेळी गडचिरोली जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहसंचालक कार्यालयाची निर्मिती करण्यासह विविध तांत्रिक आणि आर्थिक मागण्यांचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.

गडचिरोली हा आदिवासी बहुल आणि दुर्गम जिल्हा असल्याने शैक्षणिक प्रशासकीय कामांसाठी येथील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना वारंवार नागपूरला जावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी गडचिरोली येथे ‘सहसंचालक, उच्च शिक्षण’ कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी, ही प्रमुख मागणी आ. अडबाले यांनी मंत्र्यांकडे लावून धरली. यामुळे जिल्हयातील उच्च शिक्षणाच्या प्रशासकीय कामांना गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चर्चेदरम्यान आ. अडबाले यांनी खालील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले: न्यायाधिकरण नियुक्ती: विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण, नागपूर येथील ‘पीठासीन अधिकारी’ हे पद दीर्घकाळापासून रिक्त आहे. तिथे तातडीने नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. समाजकार्य महाविद्यालय कर्मचारी: सन २००५ नंतर नियुक्त झालेल्या समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातून १०% प्रमाणे कपात होणाऱ्या शासन हिश्याच्या रकमेचा भरणा त्यांच्या डीसीपीएस खात्यात तातडीने करावा. निवृत्ती उपदान सेवा: १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर सेवेत रुजू झालेल्या वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या जुन्या सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ सेवा जोडण्याबाबत स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे.

यावेळी आ. अडबाले यांच्यासोबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती शिक्षक मतदार संघाचे अधिकृत उमेदवार दिलीप कडू, राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल भारसाकळे आणि अमरावती शहर अध्यक्ष नंदकिशोर नवरे यांची उपस्थिती होती. मंत्र्यांनी या सर्व मागण्या सकारात्मकतेने ऐकून घेतल्या असून, संबंधित विभागाकडून अहवाल मागवून लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

आमदार सुधाकर अडबाले यांच्या या पाठपुराव्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात आणि प्राध्यापक संघटनेत समाधानाचे वातावरण असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची आशा पल्लवित झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button