
खेळ आणि गाण्यांतून दिला व्यसनमुक्तीचा संदेश
गडचिरोली : भावी पिढीला व्यसनांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आणि शाळांचा परिसर पूर्णतः तंबाखूमुक्त करण्यासाठी ‘मुक्तीपथ’ अभियानांतर्गत देसाईगंज तालुक्यातील ३३ शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
मुक्तीपथचे तालुका संघटक लेखाराम हुलके व तालुका प्रेरक हेमंत मेश्राम यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. केवळ व्याख्याने न देता, खेळ, गाणी आणि प्रत्यक्ष कृतींच्या माध्यमातून तंबाखूचे शरीरावर होणारे घातक दुष्परिणाम अत्यंत सोप्या भाषेत पटवून देण्यात आले. “विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहून आपली शाळा आणि गाव तंबाखूमुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या मोहिमेत तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फरी, कसारी, तुळशी, शंकरपूर, पोटगाव, सांवगी, गांधीनगर, आमगाव, कोंढाळा, चोप, बोल्धा, विहीरगाव, एकलपूर, डोंगरगाव, किन्हाळा, मोहटोला, कोकडी, जुनी वडसा यांसह लोकमान्य टिळक विद्यालय (कोंढाळा), कमलेश उके हायस्कूल, किसान विद्यालय (कोरेगाव), डॉ. आंबेडकर विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल (कुरुड), आदर्श इंग्लिश हायस्कूल, रेणुकाबाई उके विद्यालय (शिवराजपूर), युवक विद्यालय (विहीरगाव), प्रगतिशील कन्या हायस्कूल, कुथे पाटील कॉन्व्हेंट, विनायक विद्यालय (विसोरा), राधेशामबाबा विद्यालय (कुरुड), लालबहादूर शास्त्री विद्यालय (डोंगरगाव), कुथे पाटील कनिष्ठ विज्ञान आणि कला महाविद्यालय तसेच महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अशा एकूण ३३ शाळा-महाविद्यालयांचा सहभाग होता. या स्तुत्य उपक्रमासाठी सर्व संबंधित शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. तंबाखूमुक्त शाळा अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनविरोधी जनजागृती निर्माण झाली.



