चंद्रपूरविदर्भ

१८ हजार वृक्षांची कत्तल अन् वाघांचा मार्ग धोक्यात! लोहारडोंगरी खाणीचा मुद्दा संसदेत; खा. डॉ. नामदेव किरसान यांनी वेधले केंद्राचे लक्ष

चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लोहारडोंगरी येथे प्रस्तावित असलेल्या लोहखनिज (Iron Ore) खाण प्रकल्पाचे पडसाद आता थेट देशाच्या संसदेत उमटले आहेत. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत हा विषय अत्यंत गांभीर्याने मांडला. या प्रकल्पामुळे होणारी पर्यावरणाची अतोनात हानी आणि वन्यजीवांच्या अधिवासावर येणारे संकट लक्षात घेता, केंद्र सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

खासदार डॉ. किरसान यांनी संसदेत या प्रकल्पाच्या भयानक परिणामांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी वृक्षांची महाकत्तल: प्रस्तावित खाणकामासाठी सुमारे ३५३ हेक्टर वनजमीन अधिग्रहित केली जाणार असून, यात तब्बल १८,००० वृक्षांची कत्तल होण्याची शक्यता आहे. वाइल्डलाईफ कॉरिडॉर धोक्यात: हा परिसर जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि घोडाझरी वन्यजीव अभयारण्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा ‘वाइल्डलाईफ कॉरिडॉर’ आहे. येथे खाणकाम सुरू झाल्यास वाघ आणि इतर वन्यजीवांच्या स्थलांतराचा मार्ग कायमचा बंद होईल. स्थानिक विरोध: या प्रकल्पामुळे निसर्गाचा समतोल बिघडणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून, त्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला आहे. इत्यादी मुद्दे संसदेत मांडले.

डॉ. किरसान यांनी नमूद केले की, राज्य वन्यजीव मंडळाच्या समितीनेही या प्रकल्पाबाबत काही महत्त्वपूर्ण आणि चिंताजनक निरीक्षणे नोंदवली आहेत. “जेव्हा तज्ज्ञ समिती आणि स्थानिक जनता दोन्हीही विरोधात आहेत, तेव्हा सरकारने केवळ उद्योगांचा विचार न करता पर्यावरणाच्या रक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी विनंती केली की, “स्थानिक नागरिकांच्या शंकांचे निरसन होईपर्यंत आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेची १००% खात्री मिळेपर्यंत केंद्र सरकारने या प्रकल्पाला गती देऊ नये. निसर्ग आणि मानवी जीवन यांचा समतोल राखण्यासाठी या विषयात तातडीने दखल घेणे अनिवार्य आहे.” संसदेत हा मुद्दा मांडल्यामुळे आता केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button