जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस सात वर्षे सश्रम कारावास
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचा न्यायनिर्णय

वर्धा : जुन्या वैमनस्यातून वयोवृद्धाच्या डोक्यावर रॉडने तसेच सळाखीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात आरोपी रणजित रामकृष्ण धवणे, रा. महाकाळ याला सात वर्षे सश्रम कारावास तसेच १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.बी. शिंदे यांनी ११ रोजी ठोठावली.
अजाबराव श्याम भोकटे (६५, रा. महाकाळ) हे ८ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास शेळ्या व गायी चारण्यासाठी महाकाळ गावालगत असलेल्या पुलाजवळ गेले असता आरोपी रणजित धवणे हा हातात रॉड घेऊन बसला होता. अजाबराव तेथून जात असताना जुन्या वैमनस्यातून रणजितने अजाब यांच्या डोक्यावर लोखंडी रॉड मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याची तक्रार सावंगी पोलिसांत दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक आर. के. सिंगनजुडे यांनी गुन्हा दाखल करून तपास केला असता आरोपीविरुद्ध पुरावे मिळाल्याने प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.
सरकारतर्फे अॅड. रश्मी आर. सोमवंशी यांनी एकूण १६ साक्षीदारांचे बयाण नोंदविले. पैरवी अधिकारी अश्विनी वानखडे यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर केले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी आरोपीस सात वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.



