
एटापल्ली : तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या वतीने भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा), अहेरी विधानसभा क्षेत्राद्वारे सोमवार, ०२ जून २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता जांबिया गट्टा येथील ११/३३ के.व्ही. उपकेंद्रावर “ताला ठोको” आंदोलन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
तालुक्यातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत अस्थिर आणि विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे त्रस्त आहेत. महावितरण विभागाच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे वारंवार वीज खंडित होणे, वेळेवर दुरुस्ती न होणे, कर्मचारी अनुपलब्ध असणे आणि तक्रारींकडे प्रशासकीय दुर्लक्ष हे प्रश्न गंभीर बनले आहेत. यामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे जीवनमान पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी वेळोवेळी निवेदने, लेखी तक्रारी आणि फोनद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र याकडे कोणताही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही, असे आंदोलकांनी म्हटले आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हा इशारा अंतिम असल्याचे स्पष्ट केले आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची असेल, असा इशारा पक्षाने दिला आहे. हे आंदोलन पूर्णतः लोकशाही मार्गाने राबवण्यात येणार असले तरी, जनतेतील तीव्र असंतोष आणि रोष लक्षात घेता भविष्यात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे राहू शकते, असेही यावेळी सांगण्यात आले.
जांबिया गट्टा येथील ११/३३ के.व्ही. उपकेंद्रावर संपूर्ण क्षेत्राकरिता किमान तीन वायरमन तात्काळ नियुक्त करावेत. २. सदर उपकेंद्रावर कार्यरत असलेल्या वायरमनच्या कामचुकार वृत्तीची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगात्मक कारवाई करावी. ३. अंदाजे सहा ऑपरेटर नियुक्त असताना प्रत्यक्षात केवळ एकच ऑपरेटर उपस्थित राहतो; त्यामुळे गैरहजर ऑपरेटरांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या आहेत
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, एटापल्ली तालुक्याने सर्व संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे की, परिस्थिती नियंत्रणात ठेवायची असल्यास तातडीने मागण्या मान्य कराव्यात आणि वीज व्यवस्थापनात सुधारणा करावी. अन्यथा, जनतेचा असंतोष आणखी वाढेल, असा इशाराही देण्यात आला आहे.



