गोंदियाविदर्भ

बनगाव आरोग्य केंद्रात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेची जिल्हा माता व बाल संगोपन अधिकाऱ्यांकडून पाहणी

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला रोखण्यासाठी १४ ते १५ वयोगटातील मुलींना मोफत लस ; पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

गोंदिया : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रेरणेतून संपूर्ण जिल्ह्यात १४ ते १५ वर्षे वयोगटातील मुलींसाठी ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहीम राबविली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, प्राथमिक आरोग्य केंद्र बनगाव येथे आयोजित लसीकरण सत्राची जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा महिलांमधील एक गंभीर आजार आहे. या आजाराला मुळापासून उपटून टाकण्यासाठी ज्या मुलींचे १४ वर्षे पूर्ण झाले आहेत, मात्र १५ वर्षे पूर्ण व्हायची आहेत, अशा मुलींना ही लस मोफत दिली जात आहे.

“या लसीकरणामुळे मुलींचे आरोग्यविषयक भविष्य सुरक्षित होणार आहे. पालकांनी कोणत्याही भीतीला किंवा अफवांना बळी न पडता आपल्या मुलींचे लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन डॉ. रोशन राऊत यांनी यावेळी केले.

पाहणी दरम्यान डॉ. राऊत यांनी लसीकरणासाठी आलेल्या मुलींशी संवाद साधला आणि त्यांचे समुपदेशन केले. यावेळी आरोग्य सेविका सरिता अंबुले यांनी सहा लाभार्थी मुलींना एचपीव्हीची लस टोचली. आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही मोफत लसीकरण सत्रे आयोजित केली जात आहेत.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी बनगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भूमेश्वर पटले, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निखिल उईके, आरोग्य सहायक प्रभाकर मुनेश्वर, आरोग्य सहायिका प्रतिमा मुनेश्वर आणि आशा सेविका उपस्थित होत्या. यावेळी मुलींसोबत त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य विभागाच्या या सक्रियतेमुळे ग्रामीण भागातील मुलींच्या आरोग्यासाठी एक भक्कम सुरक्षा कवच तयार होत असून, पालकांकडूनही या मोहिमेचे स्वागत केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button